Car Theft: शेअर बाजारातील तोट्यामुळे तरूण बनला चोर; मित्राची नवी कोरी होंडा एलीव्हेट कार पळवली
Car Theft: शेअर बाजारातील मोठा तोटा आणि डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी मित्राची १४ लाखांची होंडा एलीव्हेट कार पळवली; पोलिसांची तत्पर कारवाई.

Car Theft- शेअर बाजारातील मोठा तोटा आणि डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी एका तरुणाने आपल्या मित्राचीच १४ लाख रुपये किमतीची कार चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कार चोरून राजस्थानच्या दिशेने चालला असतना बावधन पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्हीच्या आधारे माग काढत त्यास अटक केली.
रोहन सत्यनारायण सोमानी (वय २६, रा. वाघोली, पुणे, मूळ रा. भिलवाडा, राजस्थान) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. बावधन येथील प्रथम सोमेश्वरदास गुप्ता यांनी त्यांची नवी होंडा एलीव्हेट कार चोरीला गेल्याची तक्रार केली होती. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार आणि पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कारचा शोध सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. चोरी केल्यानंतर आरोपी वाघोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि चाळीसगावमार्गे धुळ्याच्या दिशेने गेल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत शिरपूर गाठले. तेथे आरोपीला कारसह ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक चौकशीत शेअर बाजारात मोठा आर्थिक तोटा झाल्याचे आरोपीने सांगितले. वडील तसेच परिचितांकडून घेतलेले पैसे परत करण्यासाठी मित्राची कार चोरून ती राजस्थानमध्ये विकण्याचा त्याचा प्रयत्न होता. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस अंमलदार बापूसाहेब धुमाळ, फारुक मुल्ला, बाबासाहेब पोटे व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.





