Bribery Case: शिरूर पोलीस ठाण्यात खळबळ! एक हवालदार ११ हजारांसह रंगेहाथ, तर दुसरा अंधारात फरार
Bribery Case: गुन्ह्यात मदत करणे अन् अटक न करण्यासाठी मागितली होती लाच; पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात शिरूर पोलीस अडकले.

Bribery Case- शिरूर पोलीस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलीस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. एका प्रकरणात पोलीस हवालदाराला ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले, दुसऱ्या प्रकरणातील हवालदाराने ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर पथकाची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.
शिरूर पोलीस ठाण्यातील हवालदार शिवाजी ज्योतीराम बनकर (वय ४४) यांच्यावरही कारवाई केली. तक्रारदार व त्यांच्या आई-वडिलांना दाखल गुन्ह्यात अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात बनकर यांनी सुरुवातीला १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे एसीबीच्या पडताळणीत निष्पन्न झाले. तक्रारदाराने यापूर्वीच ५ हजार रुपये दिले होते.
त्यानंतर उर्वरित रकमेपैकी ४ हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य करून बनकर यांनी ११ हजार रुपयांची मागणी केली होती. (दि.३०) सप्टेंबर रोजी जुन्या शिरूर पोलीस ठाणे परिसरात सापळा रचला. रस्त्याच्या कडेला तक्रारदाराकडून ११ हजार रुपये स्वीकारताना शिवाजी बनकर यांना एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांना त्याचदिवशी रात्री ताब्यात घेतले.
दोन्ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केल्या. सतीश मुंढे प्रकरणात पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे यांनी सापळा अधिकारी म्हणून, तर शिवाजी बनकर प्रकरणात पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे यांनी सापळा अधिकारी म्हणून काम पाहिले. प्रकरणांचा पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.
पथकाला हवालदाराची हुलकावणी
शिरूर पोलीस ठाण्यातील हवालदार सतीश मुंढे (वय ४५) यांच्याविरोधात ही कारवाई केली. तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध शिरूर पोलिसांत बीएनएसच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास हवालदार मुंढे यांच्याकडे होता. गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांना अटक न करण्यासाठी तसेच तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात मुंढे यांनी एक लाखांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
तडजोडीनंतर ही रक्कम ९५ हजार रुपये ठरली. (दि.३०) रोजी टाकळी हाजी पोलीस चौकी येथे सापळा रचला. सतीश मुंढे यांनी तक्रारदाराकडून ९५ हजार रुपये स्वीकारले. मात्र, पथकाची चाहूल लागताच मुंढे यांनी लाचेची रक्कम घेऊन अंधाराचा फायदा घेत पलायन केले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.





