Car Fire : वरंधा घाटात थरार! धावत्या ‘इनोव्हा’ने अचानक पेट घेतला; वळणावर होत्याचं नव्हतं झालं
Car Fire : उंबर्डेवाडी वळणावर 'इनोव्हा' कार पूर्णतः जळून खाक, घाट परिसरात आग विझवण्याच्या साधनांची कमतरता पुन्हा चर्चेत.
Updated On:

Car Fire – भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात मंगळवारी (दि. १७) पहाटेच्या सुमारास एका धावत्या इनोव्हा कारला अचानक भीषण आग लागली. उंबर्डेवाडी (ता. भोर) येथील वळणावर घडलेल्या या घटनेत कार पूर्णतः जळून खाक झाली असून सुदैवाने कारमधील तिन्ही प्रवासी सुखरूप बचावले आहेत.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, महाड येथील रहिवासी असलेले संतोष नगरकर, दत्ता व्हगाडे आणि शंकर शिर्के हे तिघे ‘इनोव्हा’ (एम. एच. ०६ बी. एम. ७९११) मधून महाडच्या दिशेने प्रवास करत होते. पहाटे घाटातील उंबर्डेवाडी वळणावर असताना अचानक गाडीच्या बोनेटमधून धूर येऊ लागला. प्रसंगावधान राखून चालकाने गाडी तातडीने रस्त्याच्या कडेला उभी केली.
सोसाट्याचा वारा असल्याने आगीची तीव्रता क्षणार्धात वाढली आणि संपूर्ण गाडी आगीच्या विळख्यात सापडली. घाट परिसरात आग विझवण्यासाठी कोणतीही आपत्कालीन व्यवस्था उपलब्ध नसल्याने आग विझवता आली नाही. डोळ्यादेखत गाडी जळून खाक झाली, मात्र तिन्ही प्रवाशी वेळीच गाडीतून बाहेर पडल्याने मोठी मनुष्यहानी टळली.




