Youth Drowns: पोहण्याचा मोह ठरला जीवघेणा! नीरा देवघर धरणात २८ वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू
Youth Drowns: पोहता येत नसल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडू लागला; मित्रांनी तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधला, मात्र खोल पाण्याचा प्रवाह ठरला घातक.

Youth Drowns – भोर तालुक्यातील वेणूपुरी येथे नीरा देवघर धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या पुण्याच्या चार तरुणांपैकी एकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. २१) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. देवेश राज मिश्रा (वय २८, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून चार तरुण सुट्टीनिमित्त वरंधा घाटात पर्यटनासाठी आले होते. मात्र, धरण पाहिल्यानंतर त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही.
त्यामुळे ते वेणूपुरी गावाच्या हद्दीतून नीरा देवघर धरणाच्या पात्रात उतरले. या दरम्यान, देवेश मिश्रा याला पोहता येत नसल्याने तो पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी सोबत असलेल्या मित्रांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र पाण्याचा प्रवाह आणि खोली जास्त असल्याने त्यांना आपल्या मित्राला वाचवण्यात यश आले नाही. मित्रांनी तातडीने ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच भोर पोलीस ठाण्याचे हिर्डोशी बीट अंमलदार अजय साळुंखे आणि त्यांचे सहकारी राज दुर्गुळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
सुरुवातीला स्थानिक पातळीवर शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश माने यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या सूचनेनुसार, भोर येथील ‘भोईराज जलआपत्ती व्यवस्थापन’ पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने पोलीस कर्मचारी अजय साळुंखे व अभय बर्गे यांच्या मदतीने धरणाच्या पाण्यात शोधमोहीम राबवून देवेशचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.





