Road Safety : जांभूळ भुयारी मार्ग बनतोय मृत्यूचा सापळा; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांचा संताप
Road Safety : आंदर मावळला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गाची भीषण दुरवस्था; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे शेकडो वाहनचालक धोक्यात.

Road Safety – मावळ तालुक्यातील जांभूळ येथील भुयारी मार्ग आणि परिसरातील मुख्य रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वाहनचालकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. आंदर मावळ भागाला जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असतानाही संबंधित विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने रस्त्यावर मोठमोठे आणि खोल खड्डे पडले आहेत.
दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी आणि मालवाहतूक वाहने या रस्त्यावरून प्रवास करतात. मात्र रस्त्याची अवस्था इतकी भयानक झाली आहे की वाहन चालवताना चालकांना खड्डे चुकवण्यासाठी सघर्ष करावा लागत आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडून गेले असल्याने वाहनांचे संतुलन बिघडत आहे. विशेष म्हणजे, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रस्त्याची ही अवस्था झाली असल्याने आगामी काही महिन्यांत परिस्थिती किती भीषण होईल याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
सध्या उन्हाळ्यातच खड्डे एवढे खोल झाले आहेत की, पावसाळ्यात हे खड्डे पाण्याखाली जातील आणि अपघातांचे प्रमाण आणखी वाढेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सोबतच जांभूळ येथील भुयारी मार्ग परिसरात अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले असून रस्त्यावर अक्षरशः खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे.
रात्रीच्या वेळी परिस्थिती आणखी गंभीर होते. अपुरा प्रकाश, खड्ड्यांमध्ये साचलेली धूळ आणि रस्त्यावरील खराब स्थितीमुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाजच येत नाही. अचानक वाहन खड्ड्यात गेल्याने चालकांचा ताबा सुटतो आणि अनेकदा अपघात होतात. अनेक दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाल्याच्या घटना घडल्या असून काही वाहनचालक थोडक्यात बचावल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. टायर फुटणे, सस्पेन्शन खराब होणे आणि चारचाकी वाहनांच्या अलाइनमेंट चुकणे अशा समस्या वाहनचालकांना दररोज सहन कराव्या लागत आहेत. स्थानिक वाहनधारकांच्या मते, रस्ता वापरायचा आणि वाहन दुरुस्तीसाठी पैसे खर्च करायचे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे नागरिक आर्थिक संकटात सापडले असताना रस्त्यांच्या निकृष्ट अवस्थेमुळे अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.





