निज्जर प्रकरणात कॅनडाचा नरमाईचा सूर; संबंध सुदृढ होत असल्याचा थॉमस यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली – हरदिप सिंग निज्जर हत्या प्रकरणात कॅनडाला भारताकडून चांगले सहकार्य मिळत असून दोन्ही देशांमधील संबंध चांगले होत असल्याचे शुक्रवारी निवृत्त झालेले कॅनडाचे एनएसआयए जोडी थॉमस यांनी म्हटले आहे. भारत हे सहकार्य करणारे राष्ट्र नाही असे मी म्हणणार नाही आणि आमच्या संबंधांत प्रगती झाली असल्याचे थॉमस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
निज्जर प्रकरणात कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी भारतावर थेट आरोप केल्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधांत काहीसा तणाव निर्माण झाला होता. भारताने तातडीने ट्रुडो यांच्या आरोपांचा इन्कारही केला होता. मात्र त्यानंतर काहीशी कटुता दोन्ही देशांमध्ये निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
दोन्ही देशांनी परस्परांच्या बड्या राजकीय अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली होती. मात्र आता जोडी थॉमस यांनी जे म्हटले आहे त्यावरून दोन्ही देशांतील संबंधांचा स्वर आता बदलतो असल्याचे सूचित होते आहे.
सीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत थॉमस म्हणाले की मला वाटते भारत आणि कॅनडा आता पुन्हा सृदढ संबंधांकडे परतले आहेत. निज्जर प्रकरणाचा तपास सुरू असून अत्यंत काळजी घेतली जाते आहे. भारताच्या माझ्या समकक्ष अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली होती व तपास पुढे नेण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
दरम्यान, भारताचे कॅनडातील उच्चायुक्त संजय कुमार यांनी थॉमस यांच्या विधानांवर कोणती प्रतिक्रिया दिली नाही. तथापि, आम्ही तपासात आम्ही सहकार्याची भूमिका स्विकारली असल्याचे त्यांनी नमूद केले.
निज्जर याची हत्या झाल्यानंतर याविषयी चर्चा करण्यासाठी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात थॉमस यांनी भारताचा दौरा केला होता. कॅनडाच्या पंतप्रधानांच्या टिप्पणीवरून भारताकडून जे प्रत्युतर आले होते ते दुर्दैवी आणि चकित करणारे असल्याचेही ते म्हणाले होते.





