Canada Open 2024 : प्रियांशु राजावतला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का….

Canada Open 2024 Badminton : कॅलगरीमध्ये रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रियांशू राजावतला जागतिक क्रमवारीत 37व्या स्थानी असलेला फ्रान्सचा ॲलेक्स लॅनियरकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह कॅनडा ओपन 2024 बॅडमिंटन स्पर्धेतील भारताची मोहीम संपुष्टात आली.
बॅडमिंटन क्रमवारीत 39व्या क्रमांकावर असलेल्या प्रियांशूला 45 मिनिटे चाललेल्या लढतीत ॲलेक्स लॅनियरकडून 21-17, 21-10 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला आणि यासह प्रियांशू बीडब्लूएफ सुपर 500 स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरला. या सामन्यापूर्वी, भारतीय बॅडमिंटनपटूने गेल्या वर्षी झालेल्या माद्रिद स्पेन मास्टर्स पात्रता फेरीत लॅनियरचा 21-18, 18-21, 21-15 असा पराभव केला होता.
Just in: END of Priyanshu’s brilliant run at Canada Open (Super 500) in Semis.
Priyanshu Rajawat (WR 39) lost to WR 37 Alex Lanier 17-21, 10-21. #CanadaOpen2024 pic.twitter.com/hzUIz2rykA
— India_AllSports (@India_AllSports) July 6, 2024
22 वर्षीय प्रियांशूने राऊंड ऑफ 32 (पहिली फेरी) मध्ये जागतिक क्रमवारीत 24 व्या क्रमाकांवर असलेल्या डेन्मार्कच्या रासमुस गेमकेचा तर राऊंड ऑफ 16 (दुसरी फेरी) मध्ये जागतिक क्रमवारीत 33व्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या ताकुमा ओबायाशीचा पराभव करून आगेकूच केली होती. यानंतर त्याने उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या अँडर्स अँटोन्सेनचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश धडक मारली होती.
त्रिशा-गायत्री जोडी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत…
अंतिम चारमध्ये पोहोचणारा तो एकमेव भारतीय होता. दुसरीकडे त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत होऊन आधीच बाहेर पडल्या होत्या. त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरीच्या जोडीला मात्र उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारता आली नाही. त्रिशा-गायत्री जोडीला तिसरे मानांकित चायनीज तैपेईच्या पेई शान हसिह आणि अन-त्झु हंग यांच्याकडून 18-21 21-19 16-21 असा पराभव पत्करावा लागला.





