Pune District : पण आमच्यात ‘तसे काही’ नाही! बेनके बंधूंच्या मिश्किल जुगलबंदीतून कुटुंबातील एकतेचा संदेश
Pune District : आमदार अतुल बेनकेच राहतील. त्यांच्या या मिश्किल वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

नारायणगाव : रोटरी क्लब नारायणगावच्या अध्यक्षपद स्वीकार समारंभात माजी आमदार अतुल बेनके आणि त्यांचे बंधू, नवनिर्वाचित अध्यक्ष अमित बेनके यांच्या भाषणातील मिश्किल जुगलबंदीने उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ निर्माण केला. या हलक्याफुलक्या संवादातून बेनके कुटुंबातील ऐक्य, परस्पर विश्वास आणि एकोप्याचे दर्शन घडले.
कांदळी औद्योगिक वसाहतीचे उद्योजक तथा जुन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अमित बेनके यांनी नुकतीच रोटरी क्लब नारायणगावच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. या कार्यक्रमाला त्यांच्या आई राजश्री बेनके, माजी आमदार अतुल बेनके, डॉ. अमोल बेनके, गौरी बेनके, धनश्री बेनके, डॉ. पल्लवी बेनके, कृषिरत्न अनिल तात्या मेहर तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भाषणात अमित बेनके म्हणाले, सन 1983-84 मध्ये स्वर्गीय वल्लभशेठ बेनके रोटरी क्लबचे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर 1985 मध्ये आमदार झाले. आता 2026 मध्ये मी रोटरीचा अध्यक्ष झालो आहे. 2029 मध्ये निवडणुका आहेत; पण आमच्यात तसे काही होणार नाही. आमदार अतुल बेनकेच राहतील. त्यांच्या या मिश्किल वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला.
त्यावर उत्तर देताना माजी आमदार अतुल बेनके यांनीही तितक्याच मिश्किल शैलीत म्हटले, अमितने 1983 आणि 1985 चा संदर्भ दिला, हे खरे आहे. पण मी अमितच्या आधी रोटेरियन झालो होतो, हे विसरून चालणार नाही.
त्यांच्या या टिप्पणीनेही उपस्थितांमध्ये पुन्हा एकदा हास्याची लकेर उमटली. यावेळी अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरच्या राजकीय परिस्थितीचाही उल्लेख केला. ते म्हणाले, त्या काळात कार्यकर्त्यांसह आमच्या कुटुंबातही संभ्रमाचे वातावरण होते. त्यावेळी आमचे कौटुंबिक स्नेही व तत्कालीन भोसरीचे आमदार विलास लांडे यांनी विनोदाने ’अतुल तू अजितदादा पवार यांच्यासोबत राहा आणि अमितला शरद पवार गटातून निवडणूक लढव,’ असा सल्ला दिला होता. मात्र आमचे कुटुंब कायम एकसंघ राहिले असून आम्ही प्रत्येक निर्णय परस्पर विश्वासाने आणि एकमताने घेतो. कार्यक्रमातील या मिश्किल संवादाने उपस्थितांची मने जिंकली. राजकीय चर्चांपेक्षा विनोदातून कुटुंबातील ऐक्य, परस्पर विश्वास आणि स्नेहाचा संदेश देण्यात बेनके बंधू यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





