Pune District : करडे गोळीबारातील पाच आरोपी जेरबंद
Pune District : यावेळी पोलिसांच्या कारवाईची परिसरात मोठी चर्चा रंगली. ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ असा स्पष्ट संदेश पोलिसांनी प्रत्यक्ष कृतीतून गुन्हेगारी प्रवृत्तींना दिला आहे.

न्हावरे : शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, करडे गावातील गोळीबार प्रकरणातील आरोपींना अवघ्या ७२ तासांत ताब्यात घेतल्यानंतर शिरुर पोलिसांनी वेगळाच पॅटर्न राबविला. शिरुर पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत आरोपींची शिरुर शहर आणि करडे गावातुन धिंड काढली. यावेळी पोलिसांच्या कारवाईची परिसरात मोठी चर्चा रंगली. ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ असा स्पष्ट संदेश पोलिसांनी प्रत्यक्ष कृतीतून गुन्हेगारी प्रवृत्तींना दिला आहे.
करडे गावातील भैरवनाथ मंदिर परिसरात जुन्या वादातून आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे करडे गावासह संपुर्ण शिरुर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी शिरुर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी शिरुर शहर आणि करडे गावातील प्रमुख रस्त्यांवरुन आरोपींची धिंड काढली. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गुन्हेगारांनी दहशत माजविल्यास ‘खाकी’ त्यांना त्याच भाषेत उत्तर देईल, असा संदेश कारवाईतून दिला. सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.
गुन्हेगारांना वचक बसवणार- क्षीरसागर
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर म्हणाले, शिरुर तालुक्यात मोठया प्रमाणात औद्योगिक वसाहत असल्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागातून तसेच बाहेरच्या राज्यातुनही अनेक कामगार शिरुर तालुक्यात येतात. यातील काही व्यक्तींच्या संगतीत स्थानिक तरुण आल्याने काही वर्षात गुन्हेगारी वाढली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हेगारांना वचक बसावा यासाठी कठोर पाऊले उचलली आहेत. त्याची सुरवात आम्ही शिरुरमधून केली आहे. यापुढे जर एखाद्याने दुसऱ्यांदा पुन्हा गुन्हा केला तर त्याला असाच सार्वजनिक ‘महाप्रसाद’ दिला जाणार आहे.





