Pune District : दादा आपल्यातच आहेत : शिवाजी क्षीरसागर
Pune District : संतांची भूमी, शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची भूमी. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला दिशा देणारी भूमी, अशी ओळख देशात आहे. याच भूमीत लोकनेते आदरणीय शरद पवार यांच्या विचारधारेची कास पकडून अजितदादा राजकारणात आले होते.

पुरोगामी महाराष्ट्राच्या भूमीत एक सर्वसमावेशक लोकनेता, ज्यांच्या ठायी ठायी जनहिताची तळमळ, शिव- फुले- शाहू- आंबेडकर यांच्या विचारधारेनुसार काम करणारे अजितदादा पवार हे होते. अजितदादा हे अकाली एक्झिट घेतील, यावर आजही विश्वास बसत नाही. दादांची चार दशकांची राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक कारकीर्द ही तेजस्वी होती. दादांच्या जाण्यावर आजही महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, जनसामान्यांना खंत बोचत आहे. दादा हवे होते. एक समाजभान जपणारे बीज पेरले होते. तेच आपले आजही दादा आपल्यातच आहेत.
महाराष्ट्र राज्याला एक वैचारिक परंपरा आहे. संतांची भूमी, शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची भूमी. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला दिशा देणारी भूमी, अशी ओळख देशात आहे. याच भूमीत लोकनेते आदरणीय शरद पवार यांच्या विचारधारेची कास पकडून अजितदादा राजकारणात आले होते. सर्व समाज घटकांना एकत्र करीत त्यांच्या प्रश्नांचे निराकारण करण्याची हातोटी अजितदादांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपली होती. शिव- फुले- शाहू- आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक असलेले दादा हे बहुजन समाजासाठी झटणारे, त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी अवितरपणे कार्य करणारे दादा संपूर्ण राज्याला परिचित होते. राजकीय, सामाजिक जीवनात काम करताना, अशी त्यांच्या भाषणाची सुरूवात अधोरेखित होत होती. त्यातच दादांच्या दूरदृष्टी ठळकपणे दिसून येत होती.
अजितदादांनी राजकारणाच्या परीघात काम करताना कधीही जात- पात, धर्म, पंथ बघितला नाही. सर्वसमावेशक विकास, सर्व घटकांना सोबत घेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतले. पक्ष संघटना असो की समाजात राबणारे हात असो त्यांना बळ देण्याचे काम अजितदादांनी केले होते. दादांच्या कामात इतकी पारदर्शकता होती की, त्यांच्या कारकीर्दीतील प्रतिमा आणि प्रतिभा उजळून निघाली होती. इतकी व्यापकता त्यांच्या कामात होती. हा दादा माणूस सर्वांना आपलासा वाटत होता. कारण त्यात सर्वसामान्यांसाठी तळमळ होती.
प्रशासनावर वचक असलेला असा लोकनेता पुन्हा होणे नाही. मंत्री बाहेर पडताच पाठ फिरविणारे प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी असतात. मात्र, दादांचे काम असले की अधिकारी, कर्मचारी हे वचकून होते. त्यात एक दरारा होता. आणि दिलेल्या कामाचा पाठपुरावा करून त्यांचे सादरीकरण करण्याचे काम अधिकाऱ्यांना होते. त्यामुळे कागदी घोडे नाचविणाऱ्या प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांची यातून सुटका होत नव्हती.
बारामती तालुक्यातील दौऱ्यावर ज्यावेळी अजितदादा हे येत होते. त्यावेळी भल्या पहाटे अधिकारी हे बारामतीकडे कूच करीत होते. कारण त्यांना सकाळी सहाची वेळ होती. अधिकारी आणि घड्याळाचे काटे यांच्यात पाठशिवणीचा खेळ रंगलेला असायचा. गेल्या चार दशकांचा जीवनपट हा दादांचा होता. त्यात अजून समाजासाठी आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी विकासाभिमुख रंग भरायचे होते. वेळेवर पोहचणारे दादा यांची मात्र, नियतीने वेळ घेतली. त्यामुळे आंतरिक वेदना आजही दादाप्रेमींच्या मनाला बोचत आहेत.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील बहुजन समाजासाठी झटणारा आणि त्यांच्याप्रती ओढ असलेला अखरेचा तारा निखळला आहे. सहा महिन्यांपूर्वी दादांची अकाली एक्झिट वेदनादायक झाली आहे. आपल्यासाठी बळ देणारा दादा माणूस, प्रसंगी ताशेरे ओढणारा मोठा भाऊ, तू लढ, असे सांगणारे नेतृत्व पुन्हा होणार नाही. ही सल राज्यातील दादाप्रेमींच्या मनात बोचत आहे. त्यामुळे दादा आजही विचाराने आणि कर्तृत्व, नेतृत्वाने आपल्याच आहेत… त्यांच्या विचारांचा वारसा संपूर्ण महाराष्ट्र जपणार आहे. त्यांच्या कार्यास जड अंतकरणाने विनम्र अभिवादन….
शब्दांकन :
शिवाजी क्षीरसागर
चेअरमन,
एस. पी. सराफ प्रा. लिमिटेड, माळेगाव बुद्रुक.
संकलन : प्रणव तावरे, माळेगाव बुद्रुक





