Pune District : आठवणीतील स्व. अजितदादा…
Pune District : या काळात तेही आपणा सर्वांसारखेच एक हळवे आणि दुसऱ्यांच्या मनाचा विचार करणारे व ज्यांच्यावर प्रेम केले, त्यांच्या मनाचादेखील विचार करणारे; मनामागील एक वेगळे मन असणारे अजितदादा होते.

अजितदादा… कडक स्वभाव, संवेदनशीलता व स्पष्टवक्तेपणा या विशेषणांचे व्यक्तिमत्त्व… त्यांच्या राजकीय जीवनाचा प्रवास सुरू झाला, त्यानंतर ही वैशिष्ट्ये व यामागील सत्य हे अनेकांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ज्यांना जसे दादा दिसले, तसे त्यांनी त्यांचे वर्णन केले व मापदंड लावले. त्यांच्या स्वभावाशी लावलेली विशेषणे जरी सत्य दिसत असली; तरी त्यामागे ही अनेक गुपिते दडलेली होती. ती सर्वांनाच उघडणे कळणे सहज शक्य व सोपे नव्हते. कारण, अत्यंत मोजक्या व्यक्तींना ते समजले. अर्थात, त्यांचा स्वभाव समजून घ्यायला तेवढे नातेही सांभाळावेच लागते.
पवार कुटुंबातील सर्वांनाच दादांचा स्वभाव, जीवनशैली आणि मन माहिती होते. राजकारण व समाजकारणातील व्यक्तींचे जीवन सार्वजनिक असते, अशा अनेक व्यक्ती स्वतःच्या वेगवेगळ्या प्रतिमा जपत असतात, काहींनी त्या तयार केलेल्या असतात; तर काहींच्या निर्माण झालेल्या असतात. सन 1986 मध्ये मा. शरद पवार काँग्रेस (आय) पक्षामध्ये सहभागी झाले, त्यानंतरच्या भेटीसाठी काटेवाडी येथील दादांच्या घरी गेलो होतो, त्या वेळी दादांचा प्रथम जवळून परिचय झाला. प्रथमदर्शनी लाजरे-बुजरे व मितभाषी दिसलेल्या दादांच्या सहवासातील गेल्या 40 वर्षांमध्ये त्यांच्या मनाचा स्वभावाचा ठाव लागला नसेल, असे होऊ शकत नाही.
दादांनी स्वतःचे जीवन अत्यंत मेहनत, जिद्द व कष्टाने सुरू केलेले होते. डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवलेले, कमी वयात त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली होती. त्यामुळे आपोआपच वाढलेली जबाबदारीची जाणीव व ती साकार करताना साहेबांचा राजकारणातील सहभाग, यामध्ये कुटुंबातील व्यक्ती म्हणून वावरताना येणाऱ्या मर्यादा, बंधने, अडचणी यांमुळे झालेल्या जड़णघडणीमधील स्वभाव वैशिष्ट्यांवर निर्माण झालेले कवच, ही दादांच्या मनाची एक बाजू होती.
समाजकारण, राजकारण म्हटले की जनसंपर्क, सहवास हा आलाच. यामध्ये मोठ्या राजकीय नेतृत्वाच्या घरांमध्ये व्यक्तींवर समाजामध्ये वावरताना येणाऱ्या मर्यादाही दादांना येत होत्या. ते जवळून पाहत होते की, सामान्यांना आपले काम करून घेण्यासाठी कोणाकडे जावे लागते? यामध्ये काय अडचणी येतात? किती हेलपाटे मारावे लागतात? पुण्याला-मुंबईला जाण्याची कोणाची आर्थिक क्षमता आहे, कोणाची नाही..? अशा व यांसारख्या अनेक बाबी स्वानुभवाने शिकलेल्या दादांनी हे प्रथमपासूनच ठरवले होते की, गरजू व्यक्ती काम करून घेण्यासाठी येतात. त्याचे काम होण्यासारखे असेल तर तातडीने हो सांगायचे आणि काम होत नसेल तर नाही म्हणून सांगायचे.
कामे करून घेण्यासाठी बारामतीकरांना पुणे-मुंबईला जावे लागू नये, हे त्यांनी स्वतः कृतीत आणले. सुरुवातीला त्यांचा स्पष्टवक्तेपणा, फटकळ स्वभाव या काही बाबी नकारात्मक स्वरूपामध्ये अनेकांनी समोर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, जनता व दादा यांच्यामध्ये मध्यस्थी असता कामा नये, ही दिशा स्वतः दादांनी ठरवलेली असल्याने पुढे, पुढे जसा अनुभव लोकांना येत गेला, तसे हा स्वभाव दादांच्या सकारात्मकतेचा गुण झाला. अल्पावधीतच ते लोकप्रिय झाले होते.
काम घेऊन आलेल्या व्यक्तीला किती स्पष्ट शब्दांत त्यांनी काहीही सांगितले; तरी कामाचा कागद वाचून संबंधितांना सूचना आदेश देऊनच त्या कामाचा निपटारा व निर्णय जागेवर होतो. एखादे काम पूर्ण झाल्याशिवाय त्यांना चैन पडत नव्हते, हे सर्वांनाच माहिती आहे.
कुटुंबवत्सल दादा : भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे, असे असले तरी भावनादेखील जपल्या गेल्या पाहिजे, यासाठी अजितदादा कायम काळजी घेत होते. पवारसाहेब सन 1988 मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर बारामतीकरांच्या विकासासाठी ध्यास घेतलेले दादा सन 1990 मध्ये साहेबांच्या मंत्रिमंडळावर आलेल्या गंडांतराच्या वेळेस आणि ते संपल्यानंतर मोरगावच्या गणपतीसमोर नतमस्तक होऊन परमेश्वराचे अस्तित्व मानणारे दादा आम्ही अनुभवले. साहेबांच्या आजारात आदिशक्तीला साकडे घालणारे दादा पाहिल्यावर त्यांनी मनामध्ये कोणती भावना जपली होती, हे यातून प्रतीत होत होते. आईवर नितांत प्रेम…त्यांच्या आरोग्याची काळजी व प्रत्येक वेळेस बारामतीत आल्यानंतर आईच्या भेटीची लागलेली ओढ, इतर भावंडांबद्दल असलेली आपुलकी, जिव्हाळा व प्रेम… कुटुंबासाठी वेळ देणारे, सुनेत्रावहिनी व मुलांसाठी आवर्जून वेळ काढणारे कुटुंबवत्सल अजितदादाच होते. त्यांच्या स्वभावाचा आणि मनाचा हाही एक वेगळा पैलू आहे. 26 नोव्हेंबर 2019 रोजी मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये दादांचे अश्रू तमाम महाराष्ट्राने पाहिले. निश्चितच या अश्रूंमागे भावना एकच होती, ती म्हणजे आपल्यामुळे पवारसाहेबांना कोणताही क्लेश होऊ नयेत…
गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय प्रवासातील दिसलेले दादा त्यांचा स्वभाव व मन या मनामागील ही एक मन वेळोवेळी दिसले. मला त्यांचा 40 वर्षांचा सहवास लाभला. या काळात तेही आपणा सर्वांसारखेच एक हळवे आणि दुसऱ्यांच्या मनाचा विचार करणारे व ज्यांच्यावर प्रेम केले, त्यांच्या मनाचादेखील विचार करणारे; मनामागील एक वेगळे मन असणारे अजितदादा होते.
पवारसाहेब हेच दैवत मानून सर्वच कुटुंबावर प्रेम, जिव्हाळा असणारे दादा होते. वेळप्रसंगी स्वतःच्या मनाला कमालीची मुरड घालताना मी त्यांना अनेकदा पाहिले आहे. कोणत्याही कारणाने कुटुंबात विचारभिन्नता होऊ नये, सर्व कुटुंब एकच विचाराने असले पाहिजे, ही त्यांची धारणा होती. पवारसाहेब हे माझे दैवत आहेत, मी जो काही आहे तो केवळ पवारसाहेबांमुळेच..अकाली पितृछत्र हरविलेल्या माझ्यासारख्या मुलास पवारसाहेबांनी एखाद्या मुलाप्रमाणे नव्हे, तर त्याहीपेक्षा जास्त प्रेम दिले. ही भावना त्यांच्या मनात कायम होती. त्यामुळे आपल्या कृतीने साहेबांना क्लेश होणार नाही, याचा ते सदोदित विचार करीत होते.
22 जुलै ः हा दिवस म्हणजे अजितदादांचा वाढदिवस म्हणजे आता दुर्दैवाने जयंती म्हणण्याची वेळ आली. वयाच्या 35 व्या वर्षी राजकारण समाजकारणात सहभाग घेऊन विकास संस्था, दूध संघ सहकारीसाखर कारखाना येथून सहभाग घेऊन कार्य करणारे दादा यांच्याबाबत मागे वळून पाहताना हा विकास प्रवास एवढा सहजतेचा नाही. एक लोकसभा, सात विधानसभा निवडणुकांमधून कायम साहेबांचा आदर आशीर्वाद घेऊनच कार्य करीत असलेले दादा अचानक वेगळी राजकीय भूमिका घेतात, ती विकासाची भूमिका घेऊन, हे बऱ्याच जणांना न समजण्यासारखे होते. दादांचा स्वभाव – आंतर व बाह्य मन वेगवेगळे होते, त्यांच्या मनामधील मन समजून घेणे किंवा त्यापर्यंत जाणे – पाहणे हे फारच कमी सहकाऱ्यांना पहायला मिळाले.
अजितदादांचे साहेबांवर एवढे प्रेम – श्रद्धा विश्वास होता की, एक वेळ मी घरी बसेन पण साहेबांचे मन मोडणार नाही, ही त्यांची विचारप्रणाली असताना त्यांना राजकीय वेगळा निर्णय घेण्याची परिस्थिती का निर्माण झाली? त्यांच्या या निर्णयाची सत्यता काय, या बाबी विचार करण्यास भाग पाडतात. एक तर मनच तयार होत नाही की दादा साहेबांच्या विचारधारेविरुद्ध गेले होते. सत्ता- राजकारण-समाजकारण हे रक्ताच्या नात्याच्या पुढे आहे काय, तसे असेल तर, श्रद्धा, निष्ठा यांच्या व्याख्याच बदलतील.
मैत्री, प्रेमात आणि युद्धात सर्व वैध मानतात, मग राजकारण हे युद्ध आहे की प्रेम, सत्ता संपादनापर्यंत सर्व संयुक्तिक वाटत होतं; परंतु लोकसभा निवडणुकीत वहिनींच्या उमेदवारीने प्रेमात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. आरोप-प्रत्यारोपामुळे कौटुंबिक जिव्हाळा जाऊन दुरावा निर्माण झाला. तो 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कायम राहिलेला दिसला.
बारामती विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व दादांनी केले आहे. बारामती तालुक्यामध्ये झालेली विकासकामे याबाबत कुणाच्याही मनामध्ये शंका नाही. दर आठ-पंधरा दिवसांनी बारामतीत येऊन नागरिकांच्या भेटी-गाठी, त्यांची कामे मार्गी लावणे हे काम केले आहे, दादांबद्दल ज्येष्ठांना आपुलकी, युवकांना आपलेपणा वाटत होता; असे असताना वहिनींच्या लोकसभा निवडणूक मतदानामध्ये बारामती तालुक्यातील बहुतांश मतदारांनी विरोधी कौल दर्शविला होता. दादांबाबत काही तक्रार नाही, असा जरी मतप्रवाह होता तर मग ही विरोधी मते जाण्याची कारणे काय, याबाबत दादांना ही चिंता वाटत होती.
विकासाचा बारामती पॅटर्न झाला असला तरी बारामतीच्या विकासाचा पाया साहेबांनी रचला दादांनी त्यावर कळस चढविला, हे सत्य आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर दादांचे मन स्थिर दिसत नव्हते. एक अनामिक हुरहूर, काळजीत ते दडपण घेऊन ते वावरताना दिसत होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्रीकरण व्हावे, याचा विचार करत होते. या अनुषंगाने काही निर्णयापर्यंतही ते पोहोचले होते. पण अचानक 28 जानेवारीची ती काळी पहाट उजाडली व आकस्मितपणे दादांच्या विमानाचा अपघात होऊन ते बारामतीकर व महाराष्ट्राला पोरके करून गेले. दादांच्या विमानाचा अपघात की घातपात यांवर बऱ्याचशा चर्चा होताना दिसून येतात; यामधून जे सत्य समोर यायचे आहे, ते येईलही परंतु दादा येणार नाहीत, असणार नाहीत.
स्पष्टवक्तेपणाची आहे सर्वदूर ख्याती
कर्तृत्वाला अफाट संधी, नकोत भाट खुशामती…
जात नाही विचारत कोणी, जातच बारामती
इथे जन्मलो, इथे वाढलो, इथेच जुळती नाती
संकलन – किरण गुजर, बारामती.





