शिरोली बुद्रुकमध्ये गुंडगिरी आणि दारूविक्रीचा हैदोस; ग्रामस्थांची जुन्नर पोलिसांकडे कारवाईची मागणी

ओझर – शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) गावातील ग्रामस्थांनी गुंडप्रवृत्तीच्या तरुणांचा बंदोबस्त आणि अवैध दारूविक्रीवर कारवाईची मागणी केली आहे. १ एप्रिल रोजी १२५ हून अधिक ग्रामस्थांच्या सह्यांसह जुन्नर पोलीस स्टेशनला अर्ज सादर करण्यात आला. गावात काही तरुण दहशत माजवत असून, सामाजिक शांतता धोक्यात आणत आहेत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
नुकत्याच झालेल्या यात्रेतील लोकनाट्य तमाशा कार्यक्रमात या तरुणांनी धुडगूस घालत महिला कलाकारांना लेझर लाइट्स आणि अश्लील शिवीगाळीने त्रास दिला. हे तरुण अवैध दारूविक्री करणाऱ्या कुटुंबातील असून, मद्यपींच्या साथीने गावात अराजकता पसरवत आहेत. ग्रामस्थांनी विरोध केल्यास दारूविक्रेत्या महिला घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करतात, त्यामुळे तक्रारीला लोक घाबरतात.
या गुंडांनी महिन्याभरापूर्वी बसस्थानकावर शालेय आणि महाविद्यालयीन मुलींना छेडले, दहावीच्या परीक्षेदरम्यान अशांतता निर्माण केली. मोटारसायकलवरून मुलींचा पाठलाग, महिलांना अश्लील भाषा आणि दमदाटी असे प्रकार वारंवार होत आहेत. ग्रामस्थ आणि शालेय प्रशासनाने समज देऊनही त्यांची मुजोरी वाढली आहे.
अवैध दारूधंदे शाळा, मंदिर परिसरात असल्याने नागरिकांना धोका वाढला आहे. ग्रामस्थांनी ठोस कारवाईची मागणी केली असून, याला वेळीच आळा न घातल्यास सर्वसामान्यांचे जगणे कठीण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. अद्याप पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. गुंडगिरी आणि दारूविक्री कधी थांबणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.





