Junnar News : शिरोली बुद्रुक येथील पुलाची दुरावस्था; ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा

जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथील दोन गावांना जोडणाऱ्या पुलाची दुरावस्था गंभीर बनली आहे. १९८२ मध्ये बांधलेल्या या पुलाची उंची सुरुवातीला ४ फूट होती, परंतु वारंवार भराव टाकल्याने ती आता केवळ १ फूट राहिली आहे. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने, पादचारी आणि शाळकरी मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पुलावरील खड्डे, बंद झालेले पाण्याचा निचरा करणारे पाईप आणि पावसाचे साठलेले पाणी यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. विघ्नहर साखर कारखान्याने संरक्षक जाळी बसविल्याने काही प्रमाणात धोका कमी झाला असला, तरी समस्येचे निराकरण झालेले नाही.
हा पूल शिरोली खुर्द, तेजवाडी, कुमशेत आणि ओझर या गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. शिरोली बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये येणाऱ्या निम्म्या विद्यार्थ्यांना या पुलाचा वापर करावा लागतो. ज्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी तालुका आमदार शरद सोनवणे यांच्याकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
जुन्नर तालुका शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष सचिन थोरवे यांनी पुलाच्या दुरुस्तीसाठी त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे, तर सरपंच प्रदीप थोरवे यांनी प्रशासनाच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता केशव जाधव यांनी हा पूल जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगितले, तर पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता परदेशी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
“माजी आमदार अतुल बेनके तर विद्यमान आमदार शरद सोनवणे यांचा तालुक्याच्या विकासात महत्त्वाचा वाटा आहे त्यांनी तालुक्याच्या रस्त्यासाठी मोठा निधी आतापर्यंत उपलब्ध करून दिला आहे. शिरोली बुद्रुक येथील या पुलाची दुरावस्था पाहता त्यांनी यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून पुलाचे काम करावे”… (प्रदीप थोरवे,सरपंच,शिरोली बुद्रुक)
जुन्नर तालुका शेतकरी संघटने कडून या पुलाच्या दुरुस्तीबाबत संबंधित विभागाला पत्रव्यवहार करणार आहोत.शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी निर्माण झालेल्या या गंभीर समस्येचे संबंधित विभागाकडून निरसन न झाल्यास या विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल……. (सचिन थोरवे, युवा अध्यक्ष जुन्नर तालुका शेतकरी संघटना)





