School: पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि जलसाक्षरतेच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक विद्यालयास महाराष्ट्र शासन वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागातर्फे सन २०२५-२६ चा ‘पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार’ (प्रथम क्रमांक) देऊन गौरविण्यात आले. २६ जानेवारी रोजी ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वानवडी, पुणे येथे आयोजित भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच विद्यालयाचे राष्ट्रीय हरित सेना विभागप्रमुख संतोष देवकुळे यांनाही राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट प्रकल्प’ राबवल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा वैयक्तिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विविध उपक्रमांची दखल – पुणे जिल्ह्यातील सुमारे २५० इको क्लब माध्यमिक शाळांमधून शिरोली विद्यालयाने प्रथम स्थान पटकावले. शाळेने राबवलेली वृक्ष लागवड व संवर्धन, पाणी साठवण, परिसर स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणविषयक नाविन्यपूर्ण प्रकल्प यांची दखल घेऊन हा ‘वृत्तस्तरीय विभाग स्तर’ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मान्यवरांच्या हस्ते गौरव – हा पुरस्कार विवेक खांडेकर (प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण), आशा भोंग (विभागीय वन अधिकारी), आणि प्रणिता नाईक (उप जिल्हा शिक्षणाधिकारी) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार, वन परिक्षेत्र अधिकारी समीर इंगळे, वनपाल मनीषा काळे व वनरक्षक मेजर रमेश खरमाळे उपस्थित होते. विद्यार्थिनींचे प्रभावी सादरीकरण – कार्यक्रमात विद्यालयाच्या इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी ध्रुवा शेलार, आर्या ढोमसे, समीक्षा भोर, धनश्री बोराडे, तमन्ना अलवी, जुई कोळी आणि स्वरा राऊत यांनी इको क्लबच्या वतीने वर्षभरात राबवलेल्या उपक्रमांचे सादरीकरण केले. त्यांच्या या सादरीकरणाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. सांघिक प्रयत्नांचे यश – या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद हांडे व पर्यवेक्षक गणेश राऊत यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या प्रकल्पांच्या यशस्वितेसाठी शिक्षक तुकाराम निधन, सुनील विरनक, अक्षय पाटोळे, विजय चौधरी, शोभा कवडे, रुपाली नलावडे, शैला गायकवाड, कविता टिकेकर, सुरेखा बांगर, कविता ढेरंगे, रामचंद्र अय्यर, संजय मोरे, आनंद सांगडे, जनार्दन खेडकर, मयूर जगताप तसेच सेवक शांताराम भारमळ व विकास गोंजारी यांनी विशेष परिश्रम घेतले.