ओझर – न्यू इंग्लिश स्कूल, शिरोली बुद्रुक येथे भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी ७:४५ वाजता शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली. यानंतर ८:१० वाजता गावातील ग्रामपंचायत, समाज मंदिर, प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी या चार ठिकाणी एकाच वेळी ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर प्रभात फेरी शाळेत परतली आणि ८:३० वाजता सत्यशील शेरकर यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात ध्वजारोहण झाले. या प्रसंगी गावचे सरपंच प्रदीप थोरवे, उपसरपंच वैशाली थोरवे, पोलीस पाटील अमोल थोरवे, तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर देवणे, नवजवान सेवा संघाचे हरिचंद्र जगताप, नंदकुमार शेरकर, शेतकरी संघटनेचे सचिन थोरवे, सुनील विधाटे, गजानन हडवळे, गोरक्ष उकिरडे, गणेश शेरकर, अभिजीत शेरकर, योगेश हांडे, रामदास थोरवे, शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद हांडे, पर्यवेक्षक अनघा घोडके, ग्रामपंचायत सदस्य, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीत आणि राष्ट्रध्वज प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच, संविधानाचे वाचन करून स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी संचलनाद्वारे ध्वजास मानवंदना दिली. शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद हांडे यांनी प्रास्ताविक केले, तर व्ही. एम. डुंबरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी दैनिक प्रभाततर्फे आदर्श सरपंच म्हणून सन्मानित सरपंच प्रदीप थोरवे यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नवजवान सेवा संघातर्फे इयत्ता १ ते १० पर्यंत प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना, तसेच संबोध परीक्षेत यश मिळवलेल्या आणि टेक्निकलच्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र अय्यर आणि निधन सर यांनी केले, तर प्रियांका पादिर यांनी उपस्थितांचे आभार मानले.