Nagpur Violence : नागपूर हिंसाचारातील आरोपीच्या घरावर बुलडोझर? फहीम खानला मनपाकडून नोटीस

नागपूर : नागपूर हिंसाचारात प्रमुख आरोपी मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीच्या शहराध्यक्ष फहीम खान याच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या फहीम खान याच्या घरावर आता बुलडोजर चालणार असल्याची शक्यता आहे. फहीम खान याने नागपूरच्या टेकानाका परिसरात घर बांधतांना काही भागात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागपूर महानगर पालिकेने त्याच्या कुटुंबाला नोटीस बजावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
फहिम खान याने घराजवळ तब्बल सुमारे 900 चौरस फुटाचे अनधिकृत बांधकाम केल्याने महानगरपालिकेने नोटीस बजावली असून बुलडोझर कारवाई होणार असल्याचे सांगितले जात आहे. शहरात लोकांच्या धार्मिक भावना भडकवून हिंसाचार घडवणे, त्यामुळे फहिम खानवर देशद्रोहाचा गुन्हा लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना अलीकडेच जिथे आवश्यक असेल तिथे बुलडोझर चालेल असे म्हटले होते. त्यामुळे फहिम खानच्या घरावर बुलडोझर चालवणार असल्याची दाट शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फहीम खान हा या हिंसाचारातील मास्तर माईंड आहे. हिंसाचाराच्या दिवशी फहीम खानने परिसरात जमाव जमावल्याचे स्पष्ट उल्लेख या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. परिणामी जमाव जमवून हिंसा भडकवल्याचा आरोप करत नागपूर हिंसाचारातील म्होरक्या फहीम खानच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असताना आता नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे फहीम खानला आणखी एक मोठा धक्का प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
नागपूर हिंसाचारात एका तरुणाचा बळी
हिंसाचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. इरफान अन्सारी असं मृत व्यक्तीच नाव आहे. नागपूरच्या मेयो रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. राडा झालेल्या भागात ते जखमी अवस्थेत आढळून आला होता. नागपूर हिंसाचार प्रकरणात आरोपींची संख्या 105 झाली आहे. आरोपींमध्ये 10 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.





