BRT Removed: २४ कोटींचा प्रकल्प मातीमोल! विश्रांतवाडीतील ४.५ किलोमीटरचा बीआरटी मार्ग अखेर हटवणार
BRT Removed: पुणे-आळंदी पालखी महामार्गावरील ६ बसथांबे असलेला मार्ग काढण्यासाठी स्थायी समिती आणि महापालिका आयुक्तांची प्रशासकीय मान्यता.

BRT Removed – विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर रस्ता या सुमारे ४.५ कि. मी. मार्गावर २४.२२ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करीत करण्यात आलेला बीआरटी मार्ग हटवण्याला कामाला सुरूवात झाली करण्यात आली असून इतर राज्यांतील धर्तीवर मोठा गाजावाजा करीत करण्यात आलेला हा प्रकल्प अखेर मातीमोल ठरला आहे, सहा बसथांबे असलेला हा मार्ग काढण्यास महापालिका प्रशासनाने सुरूवात केली आहे.
पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पहिल्या टप्यात वाहतूक कोंडीच्या ठिकाणचा विश्रांतवाडी चौक ते परुळेकर शाळा (शांतीनगर) दरम्यान सुमारे ५०० मी. लांबीचा बीआरटी मार्ग साठे बिस्कीट बसस्थानकासह काढण्यात आला आहे. पुणे-आळंदी पालखी महामार्गावरील विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर रोड दरम्यानची बीआरटी काढण्यासाठी स्थायी समितीची मान्यता मिळाली असून, त्याला महापालिका आयुक्त यांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
त्यानुसार विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर रोड टप्प्यातील बीआरटी मार्ग काढण्यात येत आहे. पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पहिल्या टप्यात केलेल्या कामांतर्गत दोन्ही बाजूच्या एकूण सुमारे २५० मी. लांबीची आर. सी. सी. लेन सेपरेटर व ७५० मी. लांबीचे लोखंडी ग्रील सेपरेटर आणि ३५ मी. लांबी आणि ४ मी. रुंदीचा बीआरटी बसस्थानक काढण्यात आले आहे. तसेच उर्वरित बीआरटी मार्ग काढण्याचे काम पथविभागाकडून लवकरच केले जाणार आहे.
बीआरटी मार्गिकेमुळे वाहतुकीस गंभीर अडथळे निर्माण होत असल्याचे स्थानिक नगरसेवक सुहास टिंगरे यांनी या संदर्भात दिलेल्या प्रस्तावात म्हटले होते. त्यानुसार प्रशासनानेही हा मार्ग काढण्याबाबतचा अभिप्राय दिला होता. दरम्यान, पीएमपीएमएलने या मार्गिकेच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. मात्र, येरवडा वाहतूक विभागाने बीआरटी हटविण्याची शिफारस करून कोंडी कमी करणे, अपघात रोखणे आणि वाहनांसाठी अधिक रस्त्याची उपलब्धता निर्माण करणे, यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे म्हटले होते.
पथ विभागाचा अहवाल…
विश्रांतवाडी चौक आणि बिंदुमाधव ठाकरे चौक येथे सुरू असलेल्या भुयारी मार्ग आणि उड्डाण पुलामुळे बीआरटी मार्गाची उपयुक्तता कमी होणार असल्याचे या अहवालात स्पष्ट केले गेले तसेच अनेक ठिकाणी बीआरटी मार्ग खंडित असून विरुद्ध दिशेने दुचाकी वाहने येत असल्याने अपघात वाढल्याचे तसेच बीआरटी हटविल्यास बससेवेसह इतर वाहनांसाठी अतिरिक्त दोन वाहतूक मार्ग उपलब्ध होऊन कोंडी कमी होईल, असा निष्कर्षही पथ विभागाने अहवालात नोंदवला, त्यानुसार कार्यवाहीला सुरूवात करण्यात आली आहे.






