Breaking News : आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल; अडचणी वाढण्याची शक्यता…

कोल्हापूर – काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्याचे आरोप मुश्रिफांवर केले होते. त्यानंतर आजपर्यंत सोमय्या आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. अश्यातच, आज हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची 40 कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली कागल तालुक्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले. तेव्हा कागलमधील काही शेतकऱ्यांनी हसन मुश्रीफ यांनी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार किरीट सोमय्यांकडे केली होती. त्यानंतर मुश्रीफांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे सुडबुद्धीतून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुक्यातील सुव्यवस्था बिघडवण्याचे काम चालू असल्याचे आरोप मुश्रीफ यांच्या समर्थकांनी केले आहे.
काल किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर असताना म्हणाले, “कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच माहिती घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बँकेत भेट घेणार आहे. अनेक शेतकरी मुंबईला भेटण्यासाठी येतात, पण मी सांगितलं मीच भेटायला कोल्हापूरला येतो. गरीब शेतकऱ्यांसाठी किरीट सोमय्या आपल्या जीवाची पर्वा करणार नाही. न्यायालयात काय होतंय पाहुया…’ असं सोमय्या यावेळी म्हणाले. त्यानंतर आज थेट मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान, 11 जानेवारी रोजी ईडीने हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. यावेळी त्यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर यावेळी छापे टाकण्यात आले होते. तब्बल 12 तास मुश्रीफांच्या घरी छापेमारी सुरू होती.





