मोठी बातमी.! मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाय ठेवू न देण्याचा इशारा, वारकऱ्यांवरील लाठीचार्जचा वाद चिघळला; कोणी दिला इशारा….

मुंबई – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला गालबोट लागणारा प्रकार समोर आला आहे. रविवारी दुपारी चारच्या सुमारास पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन झटापट झाली. यामध्ये पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे किरकोळ झटापट झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेवरून शिंदे फडणवीस सरकारवरही विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार टीका केली असल्याचं दिसून आलं आहे. तर दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व आरोप फेटाळला आहे. यावेळी फडणवीस म्हणाले, ‘आळंदी येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका.
आपल्यासाठी वारकऱ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्वाची आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्यावर्षी चेंगराचेंगरी होऊन काही महिला जखमी झाल्या होत्या, तशी स्थिती निर्माण होऊ नये, याला पोलिसांचे प्रथम प्राध्यान्य होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, अश्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंढरपूरमध्ये पाय ठेवू देणार नसल्याचं इशारा देण्यात आला असून, यामुळे ऐन वारीच्या दिवसात नवीन राजकारण उफाळून आल्याचं दिसून येत आहे. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतोष शिंदे यांनी हा इशारा दिला आहे.
“नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची माफी मागावी. अन्यथा आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये पाय ठेवू देणार नाही…. आळंदीत एका खोलीत कोंडून झालेली मारहाण अर्थात वारकऱ्यांवर झालेला हल्ला हा शिंदे-फडणवीस सरकारचा नाकर्तेपणा आहे. वारकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून माफी मागा..’ अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतोष शिंदे यांनी केली आहे.




