Boxing Day Test (SAvIND & AUSvPAK) : ‘बॉक्सिंग डे कसोटी’ म्हणजे काय रे भाऊ? का आणि कधी सुरू झाले सामने? जाणून घ्या, इतिहास…

What is Boxing Day Test : ‘बॉक्सिंग डे’ हे नाव ऐकून तुम्हाला वाटत असेल की इथे बॉक्सिंगबद्दल बोलले जात असेल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बॉक्सिंग डेचा बॉक्सिंगशी काहीही संबंध नाही. ख्रिसमस नंतरचा दिवस (25 डिसेंबर) जगातील अनेक भागांमध्ये बॉक्सिंग डे म्हणून ओळखला जातो. क्रिकेट जगतात, ऑस्ट्रेलियामध्ये दरवर्षी या दिवशी कसोटी सामना सुरू होतो आणि त्याला ‘बॉक्सिंग डे टेस्ट’ म्हणतात. ऑस्ट्रेलियाचा संघ या दिवशी मेलबर्न येथेच कसोटी सामना खेळतो.
बॉक्सिंग डे म्हणजे काय..?
25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 26 डिसेंबर या दिवसाला बॉक्सिंग डे म्हणतात. बॉक्सिंग डे हा एक प्रकारे अशा लोकांना समर्पित आहे जे ख्रिसमसच्या दिवशीही सुट्टी न घेता आपल्या कर्तव्यात व्यस्त असतात. बॉक्सिंग डेच्या दिवशी अशा लोकांना गिफ्ट बॉक्स देऊन आनंद व्यक्त केला जातो आणि त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवण्याची परवानगी म्हणजेच खास सुट्टी दिली जाते. या कारणास्तव, ख्रिसमस नंतरचा दिवस बॉक्सिंग डे म्हणून ओळखला जातो.
बॉक्सिंग डे का साजरा केला जातो?
असे म्हणतात की, राणी व्हिक्टोरियाच्या कारकिर्दीत, ब्रिटिश साम्राज्याच्या नोकरांना त्यांच्या राजा किंवा राणीच्या हातून ख्रिसमस भेटवस्तू दिल्या जात होत्या. या भेटवस्तूंना ‘ख्रिसमस बॉक्स’ असे म्हणतात आणि तेव्हापासून 26 डिसेंबर हा दिवस ‘बॉक्सिंग डे’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
बॉक्सिंग डे टेस्ट म्हणजे काय?
बॉक्सिंग डे टेस्ट हा एक सामना आहे जो दरवर्षी 26 डिसेंबरला म्हणजेच ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी खेळला जातो. मेलबर्नमध्ये दरवर्षी बॉक्सिंग डे टेस्ट आयोजित केली जाते, परंतु आता हा दिवस जगाच्या इतर भागांमध्येही साजरा केला जातो. महत्वाची बाब म्हणजे बॉक्सिंग डेच्या दिवशी मेलबर्न क्रिकेट मैदान खचाखच भरलेले असते.
यंदाच्या वर्षी दोन बॉक्सिंग डे कसोटी सामने –
IND vs SA & PAK vs AUS : सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकाविरध्द (IND vs SA Boxing Day Test) आणि पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध (PAK vs AUS Boxing Day Test) कसोटी मालिका खेळणार आहे. हे दोन्ही सामने 26 डिसेंबर म्हणजेच बॉक्सिंग डेला सुरू होणार आहेत. या दिवशी भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरू करेल, तर तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जाईल.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे, जिथे टीम इंडियाने T20 आणि एकदिवसीय मालिका खेळली आहे आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वात मोठी कसोटी म्हणजेच दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना खेळण्याची वेळ आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथील ऐतिहासिक सुपरस्पोर्ट पार्कवर सुरू होणार आहे. 26 डिसेंबरपासून सुरू होणारा कसोटी सामना म्हणजे बॉक्सिंग-डे कसोटी सामना होय.
बॉक्सिंग डे कोणत्या देशांमध्ये साजरा केला जातो?
ख्रिसमसच्या एक दिवसानंतर बॉक्सिंग डे साजरा केला जातो. एकेकाळी ब्रिटिश साम्राज्याचा भाग असलेले युनायटेड किंगडम आणि इतर देश हा दिवस साजरा करत असत. तो प्रथम मेलबर्न येथे साजरा करण्यात आला. नंतर यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, नायजेरिया, त्रिनिदाद आणि दक्षिण आफ्रिकेसह इतर अनेक देशांचा समावेश होत गेला.
बॉक्सिंग डे टेस्टचा इतिहास…
1950 साली मेलबर्न येथे पहिला बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळला गेला होता. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेदरम्यान हा सामना झाला. मात्र, हा सामना 22 डिसेंबर रोजी सुरू झाला होता, या सामन्याचा 5 वा दिवस बॉक्सिंग डे (26 डिसेंबर) रोजी आला होता. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. 1952 मध्ये दक्षिण आफ्रिकेने पहिला बॉक्सिंग डे कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला होता. त्यानंतर 1968 मध्ये बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळला गेला. 1980 हे असे वर्ष ठरले जेव्हापासून दरवर्षी बाॅक्सिंग डे टेस्ट खेळण्याची परंपरा सुरू झाली. 1980 पासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियन संघ सतत बॉक्सिंग डे कसोटी खेळत आहे. ऑस्ट्रेलियाशिवाय दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंडसारख्या संघांनाही बॉक्सिंग डेच्या दिवशी सामने खेळायला आवडतात. टीम इंडिया वेळोवेळी बॉक्सिंग डे टेस्टचा भाग बनते.
बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारताची कामगिरी…
भारतीय संघानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत एकूण 9 बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान टीम इंडियाला केवळ 2 सामने जिंकता आले आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने 5 सामने जिंकले तर 2 सामने अनिर्णित राहिले. हे 9 कसोटी सामने 1985, 1991, 1999, 2003, 2007, 2011, 2014, 2018 आणि 2020 मध्ये खेळले गेले. याशिवाय भारताने वेस्ट इंडिज (1987), दक्षिण आफ्रिके विरूध्द 1992, 1996, 2006, 2010, 2013, 2021 साली आणि न्यूझीलंड (1998) विरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळले आहेत.
आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. भारतीय क्रिकेट संघाने आपला शेवटचा बॉक्सिंग-डे कसोटी सामना दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 26 डिसेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमध्ये खेळला होता. त्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव केला होता. ज्यामध्ये सलामीवीर फलंदाज केएल राहुलच्या 123 धावांच्या ऐतिहासिक शतकाचाही समावेश होता. या सामन्यात केएल राहुलला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरविण्यात आले होते.
MS Dhoni: धोनीने सांगितला पुढचा प्लान; निवृत्तीनंतर भारतीय सैन्यात घालवणार वेळ
क्रिकेटशिवाय इतर अनेक खेळांमध्येही बॉक्सिंग डे….
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका यांसारखे देश दरवर्षी बॉक्सिंग डे कसोटीने आपले वर्ष संपवण्याचा आणि नवीन वर्षाची सुरुवात नवीन वर्षाच्या कसोटीने करण्याचा प्रयत्न करतात. बॉक्सिंग डे हा केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नसून ख्रिसमसनंतर कॉमनवेल्थ देशांमध्ये या दिवशी इतर खेळाचे सामने खेळवले जातात. क्रिकेटशिवाय इतर अनेक खेळांमध्येही बॉक्सिंग डेला सामने खेळवले जातात. काही देशांमध्ये, बॉक्सिंग-डे कसोटी व्यतिरिक्त, देशांतर्गत स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. यासोबतच अनेक वेळा इंग्लिश प्रीमियर लीग, स्कॉटिश प्रीमियर लीगचे सामने बॉक्सिंग डे च्या दिवशीच झाले आहेत.





