IND vs AUS 4th Test | बॉक्सिंग डे टेस्टमधून शुभमन गिलला का वगळले? समोर आलं मोठे कारण…

IND vs AUS 4th Test (Shubman Gill) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा आणि बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे. मेलबर्न कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून शुभमन गिलला वगळण्यात आले. जरी या मालिकेत गिलची आतापर्यंतची कामगिरी काही विशेष झाली नसली तरी गिलच्या अनुपस्थितीमुळे चाहत्यांनाही आश्चर्य वाटत आहे. आता गिलच्या बॉक्सिंग डे कसोटीतून बाहेर राहण्यामागचे कारणही समोर येत आहे.
गिलला का मिळाली नाही संधी…
बॉक्सिंग डे कसोटीसाठी शुभमन गिलला टीम इंडियातून वगळण्यात आले आहे. कर्णधार रोहित शर्माने गिलच्या जागी स्वत:ला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे आणि संघात वॉशिंग्टन सुंदरचा समावेश केला आहे. 2020 पासून घराबाहेर (परदेशात) गिलची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. गिलची सरासरी केवळ 28.5 इतकी आहे.
या मालिकेतही त्याची कामगिरी काही खास नव्हती. गिल पर्थ कसोटी खेळू शकला नाही. यानंतर, त्याने ॲडलेड कसोटीत पुनरागमन केले, ज्यामध्ये गिलने पहिल्या डावात 31 धावा आणि दुसऱ्या डावात 28 धावा केल्या. याशिवाय गाबा कसोटीच्या एका डावात त्याच्या बॅटमधून फक्त 1 धाव निघाली होती. आता टीम इंडिया मेलबर्न कसोटीत 2 फिरकी गोलंदाजी अष्टपैलू खेळाडूंसह दाखल झाली आहे, त्यामुळे गिलला बाहेर राहावे लागले आहे.
शुभमन गिल संघ संयोजनात बसला नाही – अभिषेक नायर
संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी गिलला वगळण्याचे कारण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “खेळपट्टी पाहिल्यानंतर आम्हाला वाटले की दोन फिरकीपटूसह मैदानात उतरणे योग्य राहिल आणि वॉशिंग्टन हा जडेजाला साथ देण्यासाठी योग्य असेल. ही परिस्थीती गिलही जाणतो, पण मला शुभमनबद्दल वाईट वाटते. त्याला संघातून वगळण्यात आलेले नाही, त्याला केवळ प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही.”
मेलबर्न कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.





