‘पुरंदर’ मिल्ककडून पुढील वर्षीपासून प्रतिलिटर तीन रुपये बोनस

खळद (पुणे) – खळद (ता. पुरंदर) येथील पुरंदर मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट कंपनीतर्फे पुढील वर्षीपसून प्रति लिटर तीन रुपये बोनस देणार असल्याचे पुरंदर मिल्क ऍग्रो प्रॉडक्ट लिमिटेडचे अध्यक्ष तथा आमदार संजय जगताप यांनी जाहीर केला.
पुरंदर मिल्कच्या वतीने शेतकऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून आमदार संजय जगताप यांच्या हस्ते एक किलो तुपाचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. त्यानंतर पुरंदर तालुक्यातील खळद येथे असणाऱ्या संस्थेच्या कोल्डस्टोअर येथे पुरंदर मिल्कची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी संजयनाना जगताप, विलास जगताप, शशिकांत दाते, अविनाश वाघोले, त्रिंबक माळवदकर, शंकर कड, बाळासाहेब भैरट, संजय ताकवले, पांडुरंग कामठे, राजीव बागवान, विठ्ठल मोकाशी, बाळासाहेब कामथे आदी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले की, पंधरा वर्षापूर्वी स्वर्गीय चंदुकाका जगताप यांनी तीन हजार पाचशे शेतकऱ्यांना एकत्र घेऊन सहकारातून खळद (ता. पुरंदर) येथे पुरंदर मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट कंपनीची स्थापना करून दुध संकलन व दुग्धजन्य पदार्थावर प्रक्रिया उद्योग सुरू केला. तेव्हापासून आतापर्यंत शेतकरी साथ देत असल्याने या उद्योगाचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे, अशीच साथ पुढेही द्या, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, यावेळी संस्थेचे 8970 गवळी यांच्या माध्यमातून 56 दूध सेंटरमधून दुधाचे संकलन केले जात आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक प्रदीप पोमण यांनी तर मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र मांढरे यांनी नियोजन केले.
आजपासून तुपाचे वाटप
संस्थेच्या वतीने दरवर्षी दिवाळी निमित्ताने सभासदांना एक किलो तूप दिले जाते. ती परंपरा या वर्षीही कायम ठेवली आहे. शुक्रवार (दि. 13) पासून खळद यथील युनिट वरती तुपाचे वाटप केले जाणार आहे. याचा सर्व सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





