Blessing Muzarabani Statement : कराराचा कागदच नाही अन् पीसीबीने घातली बंदी! मुझरबानीने ‘केकेआर’ला निवडलं म्हणून पाकिस्तानचा जळफळाट
Blessing Muzarabani Statement : पीएसएल (PSL) सोडून आयपीएलला पसंती दिल्याने संतापलेल्या पीसीबीने मुजरबानीवर २ वर्षांची बंदी घातली आहे, ज्याला आता मुजरबानीच्या एजंटने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Blessing Muzarabani statement on PCB Ban PSL : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने झिम्बाब्वेचा पेसर ब्लेसिंग मुजरबानी याच्यावर पीएसएलमध्ये खेळण्यासाठी दोन वर्षांची बंदी घातली आहे. मुजरबानीने इस्लामाबाद युनायटेडशी केलेला करार मोडल्याचा आरोप पीसीबीने केला आहे. मात्र, मुजरबानीच्या एजंटने हे सर्व आरोप फेटाळून लावत पीसीबीला आरसा दाखवला आहे. “ज्या करारावर आम्ही कधी स्वाक्षरीच केली नाही, तो मोडण्याचा प्रश्नच येतो कुठे?” असा सवाल मुजरबानीने विचारला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुजरबानी पीएसएल २०२६ च्या लिलावात अनसोल्ड राहिला होता. त्यानंतर इस्लामाबाद युनायटेडने बदली खेळाडू म्हणून त्याच्याशी संपर्क साधला आणि १.१ कोटी पाकिस्तानी रुपयांची ऑफर दिली. इस्लामाबादने तो संघात सामील झाल्याचे सोशल मीडियावर जाहीरही केले. मात्र, त्याच वेळी आयपीएलमध्ये केकेआरने मुस्तफिजुर रहमानच्या जागी मुजरबानीला ऑफर दिली. मुजरबानीने आयपीएलची संधी स्वीकारली, ज्यामुळे पाकिस्तान बोर्ड संतापले.
मौखिक सहमती की लेखी करार?
All we have to say on the matter.#psl #cricket #truth #ipl pic.twitter.com/zuV07gz5ET
— WSX Cricket (@WSXcricket) April 19, 2026
पीसीबीने आता कबूल केले आहे की मुजरबानी आणि फ्रँचायझी यांच्यात कोणताही लेखी करार झाला नव्हता, फक्त मौखिक सहमती झाली होती. मुजरबानीचे एजंट रॉब हंफ्राइज यांनी सांगितले की, “इस्लामाबादने घोषणा केल्यानंतर आम्ही दोन आठवडे अधिकृत कागदपत्रांची वाट पाहिली. कोणताही लेखी करार नसल्यामुळे झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने ‘एनओसी’ दिली नाही. जेव्हा अधिकृत कागदपत्रे मिळाली नाहीत, तेव्हाच आम्ही केकेआरचा प्रस्ताव स्वीकारला.”
पीसीबीने मुजरबानीचा हा पवित्रा ‘बिगरव्यावसायिक’ असल्याचे सांगत आपल्या बंदीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. मात्र, आयपीएलच्या झगमगाटासमोर पीएसएलला नाकारल्याने पाकिस्तानची नाचक्की झाल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.





