Chris Gayle Team : युरोपमधील पहिल्या फ्रँचायझी लीगमध्ये ख्रिस गेलची मोठी गुंतवणूक! ‘युनिव्हर्स बॉस’च्या नव्या टीमचं नाव काय?
Chris Gayle Team : वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल याने युरोपियन टी-२० प्रीमियर लीगमध्ये या संघाचा सह-मालक म्हणून क्रिकेटच्या मैदानातून आता 'बिझनेस'च्या मैदानात एन्ट्री घेतली आहे.

Chris Gayle Team Glasgow Mugafians ETPL 2026 : क्रिकेटसाठी नवं केंद्र म्हणून उदयास येत असलेल्या युरोपमध्ये आता ‘युरोपियन टी-२० प्रीमियर लीग’चा (ETPL 2026) थरार पाहायला मिळणार आहे. या लीगची ग्लासगो फ्रँचायझी ‘ग्लासगो मुगाफियन्स’ नावाने मैदानात उतरणार आहे. या संघाची मालकी तांशा बत्रा यांच्याकडे असून, ख्रिस गेल हा सह-मालक आणि ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.
अभिषेक बच्चनचा पुढाकार –
ईटीपीएलचे सह-मालक आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन यांनी या नव्या प्रवासाचे स्वागत केले आहे. अभिषेक म्हणाला की, “मुगाफी ग्रुप आणि ख्रिस गेल यांचे आमच्या कुटुंबात स्वागत आहे. युरोप हे क्रिकेटसाठी अफाट क्षमता असलेले क्षेत्र आहे. ईटीपीएल केवळ एक लीग नसून स्थानिक खेळाडूंना जागतिक स्तरावर नेणारा एक भक्कम मंच ठरणार आहे.”
ख्रिस गेलचा नवा अध्याय –
The Universe Boss has a new home! 🌍🏏
Glasgow Mugafians officially join the ETPL family. legendary Chris Gayle is a Co-Owner
August 26 onwards, 33 matches across Europe! #ETPL #GlasgowMugafians #ChrisGayle pic.twitter.com/QEcvtmtCgq
— Prabhu (@Cricprabhu) April 20, 2026
आपल्या नव्या भूमिकेबद्दल ख्रिस गेल अत्यंत उत्साही आहे. “ग्लासगो मुगाफियन्सचा सह-मालक होणे हा माझ्या आयुष्यातील एक रोमांचक अध्याय आहे. युरोपमध्ये क्रिकेटची मोठी बाजारपेठ आणि टॅलेंट उपलब्ध आहे. भविष्यातील स्टार्स तयार करण्यासाठी ही लीग महत्त्वपूर्ण ठरेल,” असे गेलने नमूद केले.
बड्या दिग्गजांचा सहभाग –
ही लीग आयसीसी मान्यताप्राप्त असून २६ ऑगस्ट ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत खेळवली जाईल. यात ग्लासगो, ॲम्स्टर्डम, एडिनबर्ग, डब्लिन, बेलफास्ट आणि रॉटरडॅम असे ६ संघ एकूण ३३ सामन्यांत भिडतील. या लीगशी स्टीव्ह वॉ, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श आणि मिचेल सँटनर यांसारखे दिग्गज जोडले गेले आहेत. आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्स क्रिकेट बोर्डांच्या सहकार्याने ही स्पर्धा साकारली जात आहे.





