पालिकेच्या मिळकतींवर भाजपचा डल्ला

पुणे – मनपाच्या ऍमेनिटी स्पेस भांडवलदार, गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीच्या कराराने देण्यात येत आहेत. यात विक्रीचाच दृष्टीकोन ठेवून धनदांडग्यांच्या घशात या मालमत्ता घालण्याचा ठराव भाजपने मान्य करून घेतला. भाजपच्या या कृतीला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी विरोध केला असून, राज्यशासनाकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ यावेळी उपस्थित होत्या.
जगताप म्हणाले, महापालिकेच्या मालमत्तांचा विषय असेल, तर तर प्रशासनाने त्याबाबतचा कृती आराखडा सर्वपक्षीय सदस्यांपुढे ठेवावा. आपल्याकडे किती ऍमेनिटी स्पेस आहेत, त्यापैकी किती दीर्घ मुदतीच्या कराराने देणार आहोत, शिल्लक किती राहणार आहेत, भविष्यातील नियोजित प्रकल्पांसाठी राखीव जागा शिल्लक ठेवण्यात आली आहे का, राखीव जागा ठेवण्यात आल्या नसतील, तर किमान 25 टक्के जागा कायमस्वरुपी मोकळ्या ठेवण्यात यावेत, या जागांवर बिल्डरांच्या निवासी किंवा व्यावसायिक इमारती उभ्या राहता कामा नयेत, डीसी रूलमध्ये अनुज्ञेय असलेल्या वापरालाच परवानगी मिळावी, याबाबतचे नियोजन केल्यास आम्ही या ठरावावर विचार करू, तोपर्यंत ठराव मान्य करू नये, अशी विनंती बैठकीपूर्वी करण्यात आली होती. परंतु, बहुमताच्या जोरावर भाजपने हा ठराव मान्य करून घेतला.’





