आपल्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा भाजपाचा डाव; हिंदीच्या सक्तीवरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

मुंबई : पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्यामागे हिंदू, हिंदी व हिंदूराष्ट्र लादण्याचा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे, अशा सक्तीला काँग्रेसचा विरोध आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट सांगितले. केली आहे. मुंबईत शुक्रवारी पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ बोलत होते.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा व दुसरीकडे बोलीपासून दूर ठेवायचे ही दुट्टपी भूमिका आहे. भाषा ही संवादाचे साधन आहे, संस्कृती आहे. एकाचवेळी तीन भाषांची सक्ती केल्यानंतर विद्यार्थ्यांनी इतर विषयांचा अभ्यास कसा करायचा. या सक्तीमुळे मुले मुलभूत ज्ञानापासून वंचित राहतील. या निर्णयामुळे इतर भाषा शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते, असंही सपकाळ म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता व संस्कृती असून आपल्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे. विविधेत एकता ही आपली ओळख असून ती ओळख पुसण्याचा भाजपाचा डाव आहे. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली.
दक्षिण भारतात हिंदी भाषेला तीव्र विरोध आहे, मग महाराष्ट्रात सक्ती का? भाषा लादण्याचा हा प्रकार देशाचे तुकडे पाडण्यासाठी आहे का? आणि मराठी भाषा बोलणारे हिंदू नाहीत का? असे सवाल करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचा कारभार ज्या भाषेत चालत होता ती भाषाच भारतीय जनता पक्ष नष्ट करायला निघाले आहे, असा हल्लाबोल हर्षवर्धन सपकाळ यांनी या पत्रकार परिषदेत केला.





