MLC Election : भाजप आमदाराच्या भावाने पहिल्याच दिवशी नेला अर्ज; इच्छुकांमध्ये खळबळ
MLC Election : भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास केदा आहेर अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

MLC Election : नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून (दि. २५) सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपचे चांदवडचे आमदार राहुल आहेर यांचे चुलत बंधू तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी उमेदवारी अर्ज नेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. केदा आहेर नेमके कोणत्या पक्षाकडून रिंगणात उतरणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पहिल्याच दिवशी पाच इच्छुकांनी एकूण आठ अर्ज नेले. मात्र, महायुतीत भाजप आणि शिवसेना यांच्यात या जागेवरून रस्सीखेच सुरू असल्याने अद्याप अधिकृत उमेदवार निश्चित झालेला नाही. महाविकास आघाडीतही उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेले नसल्याने एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही.
आहेर बंधूंमधील दुरावा पुन्हा चर्चेत – (MLC Election)
विधानसभा निवडणुकीवेळीही केदा आहेर भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी अखेरच्या क्षणी विद्यमान आमदार राहुल आहेर यांनाच उमेदवारी दिली होती. यानंतर नाराज झालेल्या केदा आहेर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती. त्या निवडणुकीनंतर आहेर बंधूंतील दुरावा उघड झाला होता.
आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने केदा आहेर पुन्हा सक्रिय झाले असून भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. मात्र, भाजपमध्ये आधीपासूनच इच्छुकांची मोठी संख्या आहे. गणेश गिते, नीलेश बोरा यांच्यासह डझनभर नेते इच्छुक असल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे.
हेही वाचा – आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील 4 महत्वाचे निर्णय; जाणून घ्या सविस्तर
महाविकास आघाडीच्या संपर्कात? (MLC Election)
भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास केदा आहेर अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वपक्षीय मतदारांचा पाठिंबा मिळू शकतो, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील काही नेतेही त्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मतदारसंख्येचे गणित काय सांगते?
उपलब्ध आकडेवारीनुसार विधान परिषद निवडणुकीत एकूण ६१९ सदस्य मतदान करणार आहेत. त्यापैकी महायुतीकडे तब्बल ४६६ सदस्यांचे संख्याबळ आहे. यात भाजपचे १८८, शिवसेनेचे १७१ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १०७ सदस्य आहेत.
तर महाविकास आघाडीकडे तुलनेने कमी ताकद असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ४५ आणि काँग्रेसचे १३ सदस्य आहेत. याशिवाय इस्लाम पार्टीचे ३५, एमआयएमचे २१ तसेच अपक्ष व इतर ४१ सदस्य आहेत.
राजकीय समीकरणांनुसार भाजप आणि शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढत झाल्यास राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत भाजप-राष्ट्रवादीचे मिळून २९५ मतदार होतात. तर महाविकास आघाडीने एमआयएम, इस्लाम पार्टी आणि काही अपक्षांना सोबत घेतल्यास केदा आहेर तुल्यबळ उमेदवार ठरू शकतात, अशी चर्चा रंगू लागली आहे.
पहिल्याच दिवशी अर्ज नेणारे इच्छुक –
केदा आहेर (अपक्ष)
फिरोज शेख (अपक्ष)
प्रतीक खरोटे (अपक्ष)
सचिन सस्कर (अपक्ष)
अजित पवार (अपक्ष)
विधानपरिषद निवडणूक वेळापत्रक २०२६ (१६ जागा)
निवडणुकीची अधिसूचना जारी करणे: २५ मे २०२६ (सोमवार)
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: १ जून २०२६ (सोमवार)
उमेदवारी अर्जांची छाननी: २ जून २०२६ (मंगळवार)
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: ४ जून २०२६ (गुरुवार)
मतदानाचा दिनांक: १८ जून २०२६ (गुरुवार)
मतदानाची वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत
मतमोजणी आणि निकाल: २२ जून २०२६ (सोमवार)
निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची अंतिम तारीख: २४ जून २०२६ (बुधवार)





