‘भाजपला दगड मारून पळण्याची सवय’; सुप्रिया सुळे यांची खोचक टीका

जळगाव – दगड मारून पळून जाण्याची भाजपची सवय आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि पक्षात प्रवेश द्यायचा, ही देवेंद्र फडणवीस यांची स्टाईल आहे. त्यामुळे युती सरकारच्या चांगल्या योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्याच्या त्यांच्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही.
फडणवीस यांचे विधान अत्यंत बालिशपणाचे आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
आपल्या काळातील चांगल्या योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यांचा हा आरोप सुप्रिया सुळे यांनी जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना जोरकसपणे फेटाळून लावला.
त्या पुढे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे अर्ज रद्द करण्याची धमकी देणारे हे नेते स्वतःला भाऊ म्हणवून घेत आहेत. हे बहिणीला धमकावून कार्यक्रमाला बोलावणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटवून घेणारे आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, सत्तेत बसलेल्या भावांनी बहीण – भावाचे नाते एवढे स्वस्त नसते हे समजून घ्यावे. बहिणींना प्रेमाने काहीही मागितले तरी ती त्याला नाही म्हणत नाही. पण तिला धमकावत असाल तर ती कुणालाही घाबरत नाही. त्यामुळे हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकाही बहिणीचा अर्ज रद्द करून दाखवा.
लोकसभेपर्यंत बहीण का आठवली नाही?
महाराष्ट्र सरकार भविष्यात आणखी योजना जाहीर करेल. पण त्यांना लोकसभा निवडणुकीपर्यंत बहीण का आठवली नाही? या भावांनी नात्यातही व्यवहार पाहिला. पण नाती पैशाने नव्हे तर प्रेमाने जोडली जातात हे त्यांनी लक्षात घ्यावे.
एक बहीण गेली तर दुसरी आणू असे ते म्हणतात. पण आमचे नाते दीड हजारांत विकले जाणारे नाही. हा आमच्या बहीण – भाऊ नात्याचा अवमान आहे, असेही सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.





