IPL 2025 : बंगळुरू चेंगराचेंगरीवरून भाजपचा आक्रमक पवित्रा; निदर्शनांनी कर्नाटक काढणार ढवळून

IPL 2025 – कर्नाटक भाजपने बंगळुरूमधील चेंगराचेंगरीवरून आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. संबंधित दुर्घटनेसाठी थेट जबाबदार असल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्या पक्षाने लावून धरली आहे. तसेच, मागणीचा दबाव वाढवण्यासाठी निदर्शनांनी संपूर्ण कर्नाटक राज्य ढवळून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाने विजेतेपद पटकावले. त्या संघाची ४ जूनला बंगळुरूमध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्या जल्लोषासाठी मोठी गर्दी उसळली. त्यावेळी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. त्या दुर्घटनेत ११ जण मृत्युमुखी पडले.
त्यावरून भाजपने कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकार, सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना घेरण्याची रणनीती अवलंबली आहे. आता भाजपने निर्दशनांची तयारी सुरू केल्याचे सूतोवाच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र यांनी केले. प्रथम १३ जूनला बंगळुरूमध्ये निदर्शन होईल.
मुख्यमंत्री निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे. त्यानंतर १६ जूनला कर्नाटकमधील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये निदर्शने केली जातील. सिद्धरामय्या आणि शिवकुमार जोपर्यंत राजीनामा देणार नाहीत; तोपर्यंत निदर्शने सुरू राहतील, असेही विजयेंद्र यांनी स्पष्ट केले.





