घराघरात तिरंगा फडकवण्यासाठी भाजपने काश्मीरमधील जनतेवर दबाव आणला – मेहबुबा मुफ्ती

श्रीनगर – प्रत्येक भारतीयाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानंतर देशभरात ठिकठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून तिरंगा यात्रा काढली जाते आहे. त्यावरून जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपवर टीका केली आहे. या पक्षाने तिरंगा हायजॅक केला असल्याचा दावा मेहबुबा यांनी केला आहे.
तिरंगा हा स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे प्रतिक आहे. भारतीय ध्वज हा केवळ एक झेंडा नाही तर देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी कॉंग्रेसने आणि देशातील जनतेने केलेल्या संघर्षाचे ते प्रतिक आहे. भाजपने केवळ त्याचे राजकीयीकरणच केले नाही तर तो हायजॅकही केला आहे. ते असे दाखवत आहेत की या देशात जसे कोणी पूर्वी तिरंग्याचा आदरच केलेला नाही असा दावा मेहबुबा यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये केला आहे.
एका अन्य ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या की भाजपच्या लोकांनी काश्मीरमधील लोकांवर तिरंगा खरेदी करण्यासाठी आणि आपल्या घरावर फडकवण्यासाठी दबाव आणला आहे. त्यासाठी त्यांनी सगळ्या उपायांचा वापर केला असून स्वत:चीच प्रतिष्ठा कमी करून घेतली आहे.





