Pune District : अतिक्रमण कारवाईविरोधात बिरदवडीकर आक्रमक
Pune District : सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या हद्दीतील अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली असून, त्याला परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

शिंदे-वासुली : चाकण-आंबेठाण मार्गावरील अतिक्रमण कारवाईविरोधात बिरदवडी परिसरातील बाधित ग्रामस्थ आक्रमक झाले असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) प्रथम स्वतःचे रस्ते पूर्ण करावेत, त्यानंतरच स्थानिक बांधकामांबाबत कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. उपजीविकेची साधने असलेली बांधकामे पाडण्याची कारवाई केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या हद्दीतील अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली असून, त्याला परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. अंतर्गत रस्त्यांवरील बांधकामांवर कारवाई करून नागरिकांना बेघर व बेरोजगार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
माजी सरपंच बाबासाहेब पवार यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, या मार्गावरून 32 गावांतील नागरिकांची ये-जा होते. एमआयडीसीकडून विकासाची अपेक्षा होती. मात्र, त्यांनी प्रथम स्वतःचे रस्ते तयार करणे गरजेचे आहे. आमची उपजीविकेची साधने पाडून आम्हाला रस्त्यावर आणण्याचा हा प्रकार आहे. एमआयडीसीने प्रथम त्यांचा 60 मीटर रुंदीचा रस्ता पूर्ण करावा. आम्ही या जागेचे मालक असताना आमच्यावर अन्याय केला जात आहे.
याविरोधात सर्व ग्रामस्थ एकवटले असून लवकरच आंदोलन करण्यात येईल. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, एमआयडीसीच्या विविध प्रकल्पांसाठी यापूर्वी जमिनी देण्यात आल्या आहेत. उर्वरित जागेवर खोल्या व गाळे उभारून अनेक कुटुंबे व्यवसायाच्या माध्यमातून आपली उपजीविका चालवत आहेत. आता या बांधकामांवर कारवाई झाल्यास व्यवसाय बंद होऊन कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
तानाजी पवार यांनी या परिस्थितीला सरकारचा नियोजनशून्य कारभार असल्याचे म्हटले. आमच्या जागेवर आमचे बांधकाम आहे, ते अतिक्रमण कसे असू शकते? प्रशासनाने आधी त्यांचा रस्ता पूर्ण करावा. आमची वास्तू आम्ही पाडू देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या वेळी माजी सरपंच बाबासाहेब पवार, विशाल पवार, मारुती शिळवणे, एकनाथ पवार, सुनील पवार, बाळासाहेब शिळवणे, संदीप पवार, किसन पवार, दशरथ काचोळे, तानाजी पवार, बेबीताई पवार, संगीता राक्षे, रामदास राक्षे, मोनिका पवार, रुपाबाई मुळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. एमआयडीसीने ग्रामस्थांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे.
तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही
दशरथ काचोळे यांनी सांगितले की, एमआयडीसीच्या पाचव्या टप्प्यासाठी त्यांच्या जमिनी यापूर्वीच गेल्या आहेत. एमआयडीसीने प्रस्तावित रस्ता पूर्ण केल्यास या मार्गावरील वाहतूक कमी होण्यास मदत होईल. मात्र, दोन्ही ठिकाणी जमीन गेल्यास आपले कुटुंब बेघर होण्याची परिस्थिती निर्माण होईल, अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली. आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, असे त्यांनी सांगितले.
कॉर्निंगचा रस्ता प्रथम पूर्ण केला पाहिजे. उड्डाणपूल किंवा इतर उपाययोजना करण्याऐवजी नागरिकांना बेघर केले जात आहे. आमच्यावर कारवाई न करता इतर रस्त्यांची कामे मार्गी लावावीत. प्रशासन शेतकर्यांच्या अंगावर येत आहे.
-बाळासाहेब शिळवणे, ग्रामस्थ





