‘सास भी कभी बहू थी 2.0’ मध्ये बिल गेट्स यांची खास एन्ट्री!

मुंबई: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगप्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स लवकरच भारतीय टेलिव्हिजनवर दिसणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री आणि ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi) च्या पहिल्या सीझनची सूत्रधार राहिलेल्या स्मृती इराणी यांच्या विशेष विनंतीवरून बिल गेट्स या मालिकेच्या ‘2.0’ या नवीन अवतारात काही भागांसाठी पाहुणे कलाकार म्हणून (Cameo Appearance) सहभागी झाले आहेत.
स्मृती इराणी यांच्याशी जुन्या संबंधांमुळे आणि समाजहिताच्या उद्देशाने बिल गेट्स यांनी मालिकेत येण्यास होकार दिला आहे. त्यांचा हा सहभाग केवळ मनोरंजन नसून, एका महत्त्वपूर्ण सामाजिक संदेशासाठी आहे. केंद्रीय मंत्री असताना स्मृती इराणी यांनी ‘मातृ-बाल पोषण’ अभियानात महत्त्वाची भूमिका बजावली होती, ज्यात बिल गेट्स यांनीही सहकार्य केले होते.
या मालिकेतील बिल गेट्स यांचा प्रवेश ‘जच्चा-बच्चा’ (आई आणि बाळ) यांच्या पोषणासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी आहे. लवकरच, ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT) प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेत बिल गेट्स व्हिडिओ कॉलद्वारे हा संदेश देताना दिसतील. टीव्हीच्या इतिहासात पहिल्यांदाच जागतिक स्तरावरील अशी व्यक्ती ‘सास-बहू’ मालिकेत दिसत असल्याने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.





