Bill Gates : लैंगिक व्यवहारातील दोषी दलाल जेफ्री एपस्टीन याच्याशी असलेले संबंध उघड झाल्यामुळे अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी उद्योजक आणि अब्जाधीश बिल गेट्स (Bill Gates) यांनी गेट्स फौंडेशनमधील आपल्या कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. मात्र त्याच बरोबर आपण काहीही अनैतिक कृत्य केले नसल्याचा खुलासाही गेट्स यांनी केला आहे. रशियाच्या दोन महिलांबरोबर आपले संबंध होते. आपल्या चुकीमुळे समाजसेवा करणाऱ्या समुहावर मळभ आले होते, हे देखील गेट्स यांनी कबूल केले आहे. पण त्याच बरोबर एपस्टीनच्या गुन्ह्यांमध्ये आपण सामील नव्हतो. एपस्टीनला आपण २०१४ पर्यंत वारंवार भेटत राहिलो. त्याच्याबरोबर खासगी विमानातून जर्मनी, फ्रान्स, न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनलाही गेलो. पण कोठेही रात्रीचा मुक्काम केला नाही किंवा एप्स्टीनच्या खासगी बेटावर मुक्काम केला नाही, असेही गेट्स म्हणाले. रशियातल्या ज्या दोन महिलांशी आपले संबंध आले त्या एपस्टीनच्या गुन्ह्यात पीडीत नव्हत्या. एपस्टीनने त्यांना नंतर शोधून काढले होते. आपण काहीही अनैतिक केले नव्हते. एपस्टीनबरोबर वेळ घालवला आणि आपल्याबरोबर गेट्स फौंडेशनच्या एक्सझिक्युटिव्हना नेले, ही आपली मोठी चूक होती. माझ्या चुकीमुळे या प्रकरणात ओढल्या गेलेल्या लोकांची मी माफी मागतो, असे गेट्स यांनी म्हटले आहे. पत्नी मेलिंडा गेट्सनी केले होते सावध… अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याबद्दल एप्स्टीनला २००८ मध्ये लैंगिक गुन्ह्यात दोषी ठरवले गेले होते. त्यानंतर तीन वर्षांनी २०११ मध्ये आपण एपस्टीनला भेटलो होतो. आपणत्याची पार्श्वभुमी तपासली नव्हती. आपली तत्कालिन पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्सनी आपल्याकडे वारंवार चिंता व्यक्त केली होती. तरी आपण एपस्टीनची भेट घेतच राहिलो होतो. ती नेहमीच एपस्टीनच्या बाबतीत थोडीशी संशयी होती. याचे श्रेय तिला द्यावे लागेल, असेही गेट्स यांनी सांगितले.