अग्रलेख : बिल गेट्स यांची भीती
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे समाजात होणार्या मोठ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी जगातील कोणतेही सरकार पुरेसे तयार नाही, अशा प्रकारची भीती मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी व्यक्त केली.

Bill Gates : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे समाजात होणार्या मोठ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी जगातील कोणतेही सरकार पुरेसे तयार नाही, अशा प्रकारची भीती मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी व्यक्त केली. त्यामुळे या विषयाला एक वेगळी दिशा निश्चितच मिळणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा म्हणजेच ‘एआय’चा ज्या वेगाने विकास होत आहे त्याच्या तुलनेत सरकारांची तयारी खूपच मागे आहे. त्याचे परिणाम भविष्यात सर्व जगाला भोगावे लागू शकतात, असा इशाराही बिल गेट्स (Bill Gates) यांनी दिला आहे. जगात सर्वत्र इंटरनेट आणि संगणकाच्या माध्यमातून मोठी क्रांती आणण्यासाठी योगदान दिलेल्या मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांनी हे विधान केले आहे, हे विसरून चालणार नाही.
आगामी कालावधीमध्ये रोजगाराच्या स्वरूपात मोठे बदल होऊ शकतात, सायबर हल्ल्यांचा धोका वाढू शकतो आणि ‘एआय’शी संवाद साधण्याचे व्यसनही लोकांना लागू शकते, अशी चिंताही बिल गेट्स यांनी व्यक्त केली आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारे सर्वच घटकांमध्ये आणि अनेक क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढू लागला आहे, ते पाहता अनेकांना आगामी कालावधीमध्ये किती मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होऊ शकते याची काळजीही वाटू लागली आहे.
नैसर्गिक बुद्धिमत्तेची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता घेत आहे, ही निश्चितच विचित्र बाब असली तरी केवळ हाच ‘एआय’चा दोष आहे असे नाही. बिल गेट्स यांनी जे इतर काही दोष आणि संभाव्य परिणामांचे उल्लेख केले आहेत तेसुद्धा महत्त्वाचे आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा अवास्तव वापर करण्याचे व्यसन लोकांना लागू शकते ही जी भीती बिल गेट्स यांनी व्यक्त केली आहे ती सर्वात महत्त्वाची आहे.
आज शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक असो वा विद्यार्थी असो किंवा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये मालक असो वा नोकर असो किंवा राजकारणासारखासुद्धा विषय असो सर्वत्रच कृत्रिम बुद्धिमत्तेचा संचार वाढल्यामुळे खरे काय खोटे काय याबाबत संभ्रमही निर्माण होऊ लागला आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये जो एखादा निबंध लिहिण्यासाठी किंवा मोठा प्रबंध लिहिण्यासाठी प्रचंड परिश्रम करण्याची गरज होती, ते काम जर एका क्लिकवर कृत्रिम बुद्धिमत्ता करून देत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या बुद्धीला गंज चढल्याशिवाय राहणार नाही, असेच बिल गेट्स यांना सुचवायचे आहे.
या सर्व परिस्थितीत जगासमोर जे बदल घडताना दिसणार आहेत, त्या बदलांना सामोरे जाण्याची सरकारांनी कोणतीही तयारी केलेली नाही हा बिल गेट्स यांचा इशाराही महत्त्वाचा मानावा लागेल. कोणताही शोध किंवा तंत्रज्ञान याच्या नेहमीच दोन बाजू असतात. शाप आणि वरदान या दोन्ही बाजूने अशा तंत्रज्ञानाकडे पाहता येते. तारतम्याने आणि नियमित, नियंत्रित पद्धतीने जेव्हा एखादे तंत्रज्ञान वापरले जाते तेव्हा ते वरदान ठरू शकते. पण या तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर हानिकारक ठरू शकतो हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाची पावलेसुद्धा त्याच दिशेने पडू लागली आहेत. ज्या गोष्टी मिळवण्यासाठी आतापर्यंत परिश्रम करावे लागत होते, त्या गोष्टी किंवा माहिती अत्यंत सहजपणे एका क्लिकवर आता उपलब्ध होऊ लागत असल्याने लोकांना या तंत्रज्ञानाचे आकर्षण आहे, यात नवल नाही. पण कालांतराने मानवी मनाचा अविभाज्य भाग असलेली सर्जनशीलता आणि सृजनशीलता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अतिरेकी वापरामुळे संपुष्टात येऊ शकते ही भीतीसुद्धा लक्षात घ्यावी लागेल.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कोणतीही क्रिएटिव्ह गोष्ट आज सहजपणे आणि कमीत कमी खर्चात करणे शक्य होऊ लागल्याने आतापर्यंत मानवी बुद्धीचा वापर करून हे काम करणारे जे हात होते त्यांना काम मिळणेसुद्धा थांबणार आहे. रोजगारावर असणार्या अनेक कर्मचार्यांनी जर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचे ज्ञान करून घेतले नाही, तरी त्यांची नोकरी धोक्यात येणार आहे हेसुद्धा वास्तव आहे.
साधारणप्रमाणे एखादी कविता लिहिणे किंवा एखादा निबंध लिहिणे हा अत्यंत उत्तम पद्धतीच्या सृजनशीलतेचा नमुना मानला जातो. पण जर एका क्लिकवर कोणालाही अशी एखादी कविता किंवा निबंध उपलब्ध होत असेल तर मानवी मेंदूसाठी सहज असलेली ती नैसर्गिक बुद्धिमत्ताच संपुष्टात येऊ शकते हा धोकाही नजरेआड करता येणार नाही.
बिल गेट्स (Bill Gates) यांनी म्हटल्याप्रमाणे जर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्राला तोंड देण्यासाठी जगातील सरकारे तयार नसतील तर त्यांनी हा इशारा वेळीच लक्षात घेऊन या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी आपली तयारी आतापासून करायला हवी.
या तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे जे संभाव्य धोके बिल गेट्स यांनी नजरेस आणून दिले आहेत ते भयानक असल्यामुळे आतापासूनच सर्व देशांनी आणि त्या देशातील सरकारांनी तयारी केली तरच या स्वागतार्ह वाटणार्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा भविष्यातील वापर आणि त्याचे परिणाम सुसह्य वाटू शकतील.






