वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट: निलेश चव्हाणच्या घरातून जप्त केली ‘ती’ वस्तू

पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेल्या निलेश चव्हाणला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी भारत-नेपाळ सीमेवरून अटक केल्यानंतर शनिवारी त्याच्या कर्वेनगरमधील घराची सखोल झडती घेतली. या झडतीत पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांचे मोबाईल फोन, निलेशचा लॅपटॉप, पासपोर्ट आणि पिस्तूल परवाना जप्त केला. या मोबाईलमधून वैष्णवीच्या छळाशी संबंधित चॅट्स आणि पुरावे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
वैष्णवी (वय २६) हिने १६ मे रोजी भुकूम येथील सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या माहेरच्या कुटुंबाने सासरच्या छळामुळे आणि २ कोटी रुपये हुंड्याच्या मागणीमुळे तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक, सासू लता, सासरा राजेंद्र, नणंद करिष्मा आणि दीर सुशील यांना आधीच अटक केली आहे.
निलेश चव्हाण हा करिष्माचा मित्र आणि शशांकचा व्यावसायिक सहकारी आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे १० महिन्यांचे बाळ निलेशकडे ठेवण्यात आले होते. बाळाची ताबा मागण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबियांना निलेशने पिस्तूल दाखवून धमकावले आणि बाळाची हेळसांड केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याच्यावर भारतीय दंड संहिता आणि किशोर न्याय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश पुण्यातून रायगड, दिल्ली, गोरखपूरमार्गे नेपाळला पळाला होता. तो नेपाळच्या भैरहवा येथे लपला असताना पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाद्वारे त्याचा माग काढला. शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या सोनोली गावात त्याला अटक झाली. शनिवारी त्याला पुण्यात आणल्यानंतर न्यायालयाने त्याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिस आता निलेश आणि हगवणे कुटुंबातील संवाद आणि वैष्णवीच्या छळातील त्याच्या सहभागाचा तपास करणार आहेत.





