Jalindar Supekar: जालिंदर सुपेकरांनी बँकेच्या लॉकरमधील पैसे अन् सोनं हडपलं; वकिलाच्या दाव्यानं खळबळ

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणामुळे चर्चेत आलेले विशेष महानिरीक्षक (कारागृह) जालिंदर सुपेकर पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांच्या आरोपानंतर आता पुण्यातील एका सावकाराच्या वकिलांनी सुपेकरांवर तब्बल 150 कोटींच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.
ॲड. निवृत्ती कराड यांनी सांगितले की, सुपेकर यांनी अमरावती कारागृहात असलेल्या कैदी नानासाहेब आणि गणेश गायकवाड यांच्याकडून जामीन मिळवून देण्याच्या मोबदल्यात तब्बल 550 कोटींची मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असल्याचे त्यांनी एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.
कराड यांच्या म्हणण्यानुसार, गायकवाड कुटुंबीयांचे बँक लॉकर, रोख रक्कम आणि सोनं जप्त करताना सुपेकर व तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी 100 ते 150 कोटींचा गैरव्यवहार केला. तसेच सुपेकरांनी गायकवाड पिता-पुत्रांना धमकावून “पैसे द्या, नाहीतर बाहेर येऊ देणार नाही” असा दम दिला होता.
तसेच, सुपेकर यांनी कारागृहातील अधिकाऱ्यांना गायकवाड यांना शारीरिक त्रास देण्याचे आदेश दिल्याचा आरोपही करण्यात आला. हे आदेश न पाळल्यामुळे अमरावती जेलचे 5-6 अधिकारी निलंबित करण्यात आल्याचेही कराड यांनी सांगितले.
या प्रकरणाने राज्यातील पोलीस प्रशासन आणि कारागृह व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या आरोपांची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे.
तुरुंगातील आरोपीकडून ३०० कोटी मागितले : सुरेश धस
आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे की, “जालिंदर सुपेकर हे हगवणे कुटुंबाचे नातेवाईक असून, त्यांनी आयजी पदावर असताना एक लाख रुपये रोख आणि ५० हजार रुपयांचा मोबाईल घेतल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. तसेच, तुरुंगातील आरोपीकडून ३०० कोटी रुपये मागितल्याची तक्रारही माझ्याकडे आली आहे,” असं सुरेश धस यांनी म्हटले आहे.





