Pune : नीलेश चव्हाणची रवानगी न्यायालयीन कोठडीत

पुणे : राज्यभर गाजलेल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी नीलेश चव्हाण याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. वैष्णवी यांची सासू लता, नणंद करिष्मा आणि पती शशांक यांचे मोबाईल नीलेश चव्हाणकडून जप्त करण्यात आले आहेत. नीलेश चव्हाण व इतर आरोपींमध्ये मोबाईलच्या माध्यमातून झालेले संभाषण व मेसेजचा तपास सुरू आहे.
वैष्णवीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ६३), दीर सुशील राजेंद्र हगवणे (वय २७), पती शशांक राजेंद्र हगवणे (वय २७), सासू लता राजेंद्र हगवणे (वय ५४), नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे (वय ३१) यांना न्यायालयाने यापूर्वीच न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलीस कोठडीची मुदत संपल्याने नीलेशला शनिवारी (दि. ७) न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करावी, असा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला. बचाव पक्षाकडून ॲड. स्वानंद गोविंदवार आणि मूळ फिर्यादीच्यावतीने ॲड. शिवम निंबाळकर यांनी कामकाज पाहिले.





