Vaishnavi Hagavane case : नीलेश चव्हाणची ‘ती’ मैत्रीण संशयाच्या भोवऱ्यात?

पिंपरी : वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी तब्बल काही दिवस फरार असलेल्या नीलेश चव्हाणला अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळ सीमेवरून अटक केली आहे. मात्र, या प्रकरणात एक नवा तपशील समोर आला आहे. नीलेशच्या फरारीदरम्यान त्याच्यासोबत एक मैत्रीण होती, जी आता पोलिसांच्या चौकशीच्या रडारवर आली आहे. Vaishnavi Hagavane death case |
नीलेश पुण्यातून पळून जाताना या मैत्रिणीसोबत दिल्लीपर्यंत गेला होता. या प्रवासादरम्यान त्याने तिच्या फोनचा वापर केला आणि एका मित्राशी संपर्क साधला. विशेष बाब म्हणजे, तो मित्र पोलिसांच्या वॉच लिस्टवर होता. त्यामुळे या मैत्रिणीची लवकरच सखोल चौकशी होणार असून, चौकशीत काही महत्त्वाची माहिती समोर आली तर तिच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
सीसीटीव्ही, फोन लोकेशन आणि फेसटाईम कॉलिंगने उघड झाला फेरा
पोलिसांनी नीलेशच्या मागावर असताना खासगी बसमधील सीसीटीव्ही फुटेज व त्याच्या कॉल डिटेल्सचा अभ्यास केला. नीलेशने मैत्रिणीचा फोन वापरून फेसटाईम कॉल केल्याचे समोर आले. त्याला वाटले की, फेसटाईम ट्रेस होणार नाही, परंतु पिंपरी-चिंचवड सायबर सेलने आयपी अॅड्रेस ट्रेस करून त्याचा ठाव घेतला आणि अखेर नेपाळ सीमेवर त्याला पकडण्यात यश आले. Vaishnavi Hagavane case |
चव्हाणच्या घरातून मोबाईल, बंदूक आणि पासपोर्ट जप्त
तपास अधिक गतीने सुरू असताना बावधन येथील चव्हाणच्या निवासस्थानी झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी तीन मोबाईल जप्त केले असून हे मोबाईल शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांचे असल्याचे समजते. या मोबाईलमधून वैष्णवीच्या मृत्यूशी संबंधित अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, चव्हाणची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्टही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
सध्या नीलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, या काळात त्याच्याकडून आणखी अनेक धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे. वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांची तपास यंत्रणा आता अधिक सुसज्ज झाली आहे. Nilesh Chvhan |





