मोठी बातमी! सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी अचानक गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडलं; कारण काय? ‘या’ नेत्याला मिळाली संधी

Guardian Minister of Gondia : राज्यातील गोंदिया जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री पद अचानक सोडले आहे. अचानक पालकमंत्री पद सोडल्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. आता या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी इंद्रनील नाईक यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ते गोंदिया जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब पाटील यांनी काल (मंगळवारी) गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडलं आहे. त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पालकमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झाले आहे. त्यामुळे त्यांना सातत्याने पायाचा प्रॅाब्लेम येत असल्यामुळे लांबचा प्रवास शक्य नाही, त्यामुळे पालकमंत्री पद सोडल्याचे सांगण्यात आले आहे.
बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्री पद सोडल्यानंतर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी इंद्रनील नाईक यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ते विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात. तसेच तरुणाईमध्ये त्यांची मोठी प्रसिद्ध असून, ते स्वतः युवा आहेत. पालकमंत्री पदावर इंद्रनील नाईक यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती स्वतः अजित पवारांच्या वतीने देण्यात आली आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्या विधानाची चर्चा
गेल्या काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नागपूरमध्ये एक भव्य मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात पक्षाचे जेष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पालकमंत्री वेळ देत नाहीत, असे विधान केले होते. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टसाठी फक्त येतात. इतर वेळी पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले होते. आता राष्ट्रवादी पक्षाच्या मंत्र्याने पालकमंत्री सोडल्यामुळे पटेल यांनी केलेल्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा : चीनसाठी हेरगिरी करत होते ट्रम्पचे सल्लागार? ; कोण आहेत अॅशले टेलिस ? ज्यांना अटक करण्यात आली





