Mumbai Pune Highway Update : वाहतूक ठप्प असतानाही टोलवसुली केल्याने संताप; अखेर सरकारने घेतला ‘हा’ निर्णय
Mumbai Pune Highway Update : हायवेवर टँकर पलटी असतानाही वाहने सोडल्याने गोंधळ वाढला; प्रवाशांकडून प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह.

Mumbai Pune Highway Update – जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली टोल नाक्याजवळ केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या २४ तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. अशाही स्थितीत प्रवाशांकडून टोलवसुली केली जात असल्याने लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मंगळवारी (दि. ३) सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ एक केमिकल वाहून नेणारा टँकर पलटी झाला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक, जुना मुंबई- पुणे हायवे जॅम झाला. या गोष्टीला जवळपास २२ तास झाले उलटले, तरी तो टँकर बाजूला काढण्यामध्ये प्रशासनाला अपयश आले आहे.
या हायवेवर टँकर पलटी झाला असतानाही या ठिकाणी वाहने सोडण्यात आल्याने या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. महत्त्वाचे म्हणजे या महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याची सूचना प्रशासनाने दिली नाही. त्यामुळेच अनेक प्रवाशांवर या ठिकाणी गेल्या २२ तासांपासून ट्रॅफिकमध्ये अडकण्याची वेळ आली.
तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या प्रवाशांना प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची देखील सोय करण्यात आलेली नाही. मात्र, अशाही परिस्थितीत या महामार्गावर टोलवसुली केली जात असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
याप्रश्नी माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले की, तूर्तास हा मार्ग मोकळा करण्यासाठी प्राथमिकता आहे. ही घटना आज घडली आहे ती चुकीची असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढणार आहे.
यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यावरही भर देणार आहोत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणे झाले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीनंतर त्या ठिकाणी टोल वसुली न करण्याच्या टोलचालकांना दिल्या आहेत.





