Maharashtra Cabinet Expansion : पाटील इज ब्रँड ! देवाभाऊंच्या मंत्रीमंडळात ‘या’ 5 पाटलांचा वरचष्मा

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीनंतर आता आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. देवेंद्र फडणवीस 3.0 सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधीचा कार्यक्रम आज नागपुरात राज भवनात पार पडला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली. या सरकारमध्ये पाटलांचा वरचष्मा पाहायला मिळाला.
1) चंद्रकांत पाटील
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. 2004 पासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात झाली. अभाविपमध्ये सलग 13 वर्षे काम केल्यानंतर त्यांना आमदारकीचं तिकीट मिळालं होतं. गिरणी कामगाराचा मुलगा ते दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. पुण्यातील कोथरूड विधानसभेमधून ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
2) गुलाबराव पाटील
जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व पाच जागा जिंकून देण्यात गुलाबराव पाटील यांचा मोठा हात होता. आता त्यांना याच कामगिरीचं बक्षिस मिळालंय. पाळधी ग्रामपंचायतीपासून राजकारणाची सुरूवात करणाऱ्या गुलाबराव पाटलांना आता कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे.
3) बाबासाहेब पाटील
अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून तिरंगी लढतीत निवडून आलेल्या बाबासाहेब पाटील यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. लातूर जिल्हा बँकेचे ते उपाध्यक्ष राहिले आहेत. बाबासाहेब पाटील हे उत्कृष्ट खेळाडू आहेत माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांचे ते पुतणे आहेत. बाळासाहेबांनी आपला राजकीय वारसा बाबासाहेब पाटलांकडे सुपूर्द केला होता.
4) राधाकृष्ण विखे पाटील
नगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रीपद मिळालं आहे. सहकार, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात दबदबा असलेल्या विखे पाटलांना आता सहाव्यांदा मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. याअगोदर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये असतानादेखील मंत्रिपद भूषवले आहे.
5) मकरंद पाटील
वाई मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीमध्ये चौकार मारणाऱ्या मकरंद पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा मकरंद पाटील यांना देखील मंत्रिपद मिळणार होतं. मात्र, त्यावेळी ते शक्य झालं नव्हतं. आता अजित पवारांनी त्यांना मंत्रीपद दिले आहे.





