Bibvewadi Fire Incident : बिबवेवाडीत अग्नीतांडव! ८ हजार चौरस फुटांचे गोडाऊन खाक; ७ दुचाकींसह टेम्पो जळून भस्मसात
Bibvewadi Fire Incident : अग्निशमन दलाची ७ वाहने आणि महापालिकेच्या ११ टँकर्सच्या मदतीने आगीवर नियंत्रण; परिसरातील दुकाने बचावली.

Bibvewadi Fire Incident – बिबवेवाडीत अप्पर डेपोजवळ ८ हजार चौरस फुटांच्या मंडप साहित्याच्या गोडाऊनला बुधवारी (दि.१२) दुपारी भीषण आग लागली. आगीत गोडाऊनमधील सर्व साहित्य तसेच आवारातील सात दुचाकी, एक टेम्पो भस्मसात झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत बचावकार्य केले. सुदैवाने, आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बिबवेवाडीतील सर्व्हे नं. ६५८, अप्पर डेपो येथे काळे अँड सन्स हे मंडप साहित्याचे गोडाऊन आहे. दुपारी १ वाजून २३ मिनिटांच्या सुमारास अचानक गोडाऊनला आग लागली. आत कापड, कार्पेट, प्लास्टिक आणि लाकडी सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीचे, धुराचे लोट परिसरात लांबून दिसत होते.
यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. आगीत गोडाऊनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी आली. दाट नागरी वस्ती आणि शेजारीच असलेल्या दुकानांमुळे आग पसरून मोठे नुकसान होण्याचा धोका होता. जवानांनी चारही बाजूंनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले.
मोहिमेत ७ अग्निशमन वाहने, महापालिकेचे ११ टँकर आणि पुणे कॅन्टोन्मेंटचे एक वाहन अशा मोठ्या यंत्रणेसह ५० जवानांनी भाग घेतला. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी विजय भिलारे, समीर शेख, सुनील नाईकनवरे व कैलास शिंदे यांनी ही आग आटोक्यात आणळी. स्थानिक नागरिक, पोलीस आणि महावितरण कर्मचाऱ्यांनीही आग विझवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
“आगीची भीषणता पाहता आम्ही तत्काळ अतिरिक्त कुमक रवाना केली. आजूबाजूला मोठी नागरी वस्ती सल्याने आग पसरू न देणे हे आमच्यापुढील मुख्य आव्हान होते. जवानांच्या सतर्कतेमुळे आग मर्यादित राहिली आणि मोठी हानी टळली.”
– देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी.





