IND W vs SL W : भारतीय महिला संघाचा विजयी चौकार! श्रीलंकेचा धुव्वा उडवत टी-२० मालिकेत ४-० ने आघाडी

IND W vs SL W India beat Sri Lanka : भारतीय महिला क्रिकेट संघाने आपले विजयाचे सत्र कायम राखत श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात ३० धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत ४-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे. फलंदाजांच्या तुफानी फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध कामगिरीमुळे टीम इंडियाने श्रीलंकेला विजयापासून रोखले.
भारतीय फलंदाजांनी उभारला २२१ धावांचा डोंगर –
श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापट्टूने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले, मात्र भारतीय सलामीवीरांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत शेफालीने अवघ्या ४६ चेंडूत ७९ धावा कुटल्या. यात १२ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
Another game in the bag ✅#TeamIndia register a 3⃣0⃣-run win and lead the series 4⃣-0⃣ 🙌
Scorecard ▶️ https://t.co/9lrjb3dMqU #INDvSL | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Pa4iFAYejx
— BCCI Women (@BCCIWomen) December 28, 2025
त्याचबरोबर स्मृतीने आपल्या क्लासचा नमुना पेश करत ४८ चेंडूत ८० धावांची खेळी केली. तिने ११ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार खेचले.डावाच्या शेवटी ऋचाने मैदानात फटक्यांची आतिषबाजी केली. तिने केवळ १६ चेंडूत नाबाद ४० धावा (४ चौकार, ३ षटकार) करत भारताला २० षटकांत २ बाद २२१ धावांपर्यंत पोहोचवले. श्रीलंकेकडून मालशा शेहानीने एकमेव बळी घेतला, मात्र इतर गोलंदाज महागडे ठरले.
हेही वाचा – Mohsin Naqvi : ‘जर भारताने हातमिळवणी केली नाही तर…’, मोहसिन नक्वींनी टीम इंडियाच्या भूमिकेवर सोडले मौन
श्रीलंकेचा अपुरा प्रतिकार ; भारतीय गोलंदाजांची चमक –
२२२ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. कर्णधार चमारी अटापट्टूने ५२ धावा आणि हसिनी परेराने ३३ धावा केल्या. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांना वेगवान धावा करता आल्या नाहीत. इमेशा दुलानीने २८ चेंडूत केवळ २९ धावा केल्या, ज्यामुळे श्रीलंकेवर धावांच्या गतीचा दबाव वाढला.श्रीलंकेचा संघ २० षटकांत ६ बाद १९१ धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताकडून अरुंधती रेड्डी आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी २ गडी बाद करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
वनडे वर्ल्ड कपनंतर टी-२० मध्येही दबदबा –
२०२५ च्या वनडे वर्ल्ड कपमधील शानदार कामगिरीनंतर भारतीय महिला संघाने टी-२० फॉरमॅटमध्येही आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सलग चौथ्या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला असून आता नजरा शेवटच्या सामन्यात ‘क्लीन स्वीप’ देण्याकडे असतील.





