Assam Gujarat Flood: पूराचा प्रलय! आसाममध्ये 62, गुजरातमध्ये 31 जणांचा मृत्यू; लाखो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत
Assam Gujarat Flood पुरामुळे शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. सुमारे 56 हजार हेक्टरपेक्षा अधिक शेती पाण्याखाली गेली असून हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Assam Gujarat Flood: देशातील आसाम आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मोठी हानी झाली आहे. आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 62 जणांचा मृत्यू झाला असून 7 लाखांहून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत. तर गुजरातमध्येही मुसळधार पाऊस आणि पुरामुळे 31 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही राज्यांमध्ये बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) माहितीनुसार, गेल्या 24 तासांत आणखी 14 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा 62 वर पोहोचला आहे. चराइदेव जिल्ह्यात सर्वाधिक सात जणांचा मृत्यू झाला असून शिवसागरमध्ये सहा आणि जोरहाटमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शिवसागर जिल्ह्यात एक व्यक्ती अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. (Assam Gujarat Flood)
आसाममधील 12 जिल्ह्यांवर पुराचा मोठा परिणाम झाला आहे. गोलाघाट, चराइदेव, डिब्रुगढ, होजाई, नगाव, बिस्वनाथ, जोरहाट, धेमाजी, शिवसागर, सोनितपूर, कामरूप महानगर आणि कार्बी आंगलोंग या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. यापैकी शिवसागर जिल्ह्यात सर्वाधिक 3.48 लाख नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. चराइदेवमध्ये 1.88 लाख, तर जोरहाटमध्ये 1.26 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातील 856 गावे आणि 37 महसूल मंडळे पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. (Assam Gujarat Flood)
पुरामुळे शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. सुमारे 56 हजार हेक्टरपेक्षा अधिक शेती पाण्याखाली गेली असून हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गेल्या 24 तासांत 17 हजारांहून अधिक जनावरे आणि कुक्कुट पक्षी वाहून गेले आहेत. एकूण 3.34 लाख पशुधन पुरामुळे प्रभावित झाले आहे. सध्या सुमारे 3.15 लाख नागरिक 363 मदत छावण्या आणि निवारा केंद्रांमध्ये राहत आहेत. (Assam Gujarat Flood)

Assam Gujarat Flood: पूराचा प्रलय! आसाममध्ये 62, गुजरातमध्ये 31 जणांचा मृत्यू; लाखो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत
सततच्या पावसामुळे ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांची पाणीपातळी धोकादायकरीत्या वाढली आहे. नागालँडमध्ये ढगफुटी झाल्याने आसाममधील पूरस्थिती अधिक गंभीर झाल्याचे मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि स्थानिक प्रशासनाने मिळून जवळपास 1,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. (Assam Gujarat Flood)
दुसरीकडे गुजरातमध्येही मुसळधार पावसामुळे मोठी हानी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाला आहे. नवसारी जिल्ह्यात सर्वाधिक 15, वलसाडमध्ये सात, खेडामध्ये चार, तर सूरत, अमरेली आणि आनंद जिल्ह्यांमध्येही मृत्यूंची नोंद झाली आहे. बहुतांश मृत्यू बुडाल्यामुळे झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
दक्षिण गुजरातमधील वलसाड आणि नवसारी जिल्ह्यांमध्ये परिस्थिती सर्वाधिक गंभीर होती. काही भागांमध्ये तब्बल सात फूट पाणी साचले होते. आता पाणी ओसरू लागले असले तरी अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये आणि रस्त्यांवर चिखल व मलब्याचे ढीग साचले आहेत. नगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. (Assam Gujarat Flood)
गुजरात सरकारने आतापर्यंत 38 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. त्यापैकी अनेकांनी नातेवाईकांकडे आश्रय घेतला असून सुमारे 2 हजार नागरिक मदत छावण्यांमध्ये आहेत. आतापर्यंत 352 जणांची सुटका करण्यात आली आहे. नवसारी जिल्ह्यात भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने एका गावातील 60 कोळंबीपालन प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. लष्कर, NDRF आणि SDRFच्या पथकांकडून मदत आणि बचावकार्य सुरूच आहे.
पूराचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. गुजरातमध्ये 50 हून अधिक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून 25 गाड्या नियोजित स्थानकापूर्वीच थांबवण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवस दोन्ही राज्यांमध्ये सतर्क राहण्याचा इशारा दिला असून प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.





