Bhor News : भोरचा कारभारी कोण? ४ विरुद्ध ४ चा थरार! सभापतीपदाचा फैसला आता चिठ्ठीवर?
Bhor News : भाजप आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी ४ उमेदवार; भोर पंचायत समितीच्या सत्तेचा पेच सुटणार की चिठ्ठी निघणार? राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता.

Bhor News – भोर पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड आज (दि. ९) होत असून, तालुक्यात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी ४ उमेदवार निवडून आल्याने संख्याबळ समसमान झाले आहे. त्यामुळे सभापतीचा फैसला चिठ्ठीद्वारे होणार की कोणाच्या अनुपस्थितीवर ठरणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
पंचायत समितीचे सभापतीपद ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी राखीव आहे. तालुक्यात एकूण ८ गण असून, त्यात दोन्ही पक्षांचे समबळ आहे. राष्ट्रवादीकडून तृप्ती खुटवड व मनीषा कंक, तर भाजपकडून गीता आंबवले व सुषमा चव्हाण या चार महिला उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी एका उमेदवाराचे नाव सभापतीपदासाठी समोर केले जाईल.
मात्र, संख्याबळ ४-४ असे बरोबरीत असल्याने चिठ्ठीद्वारे नशीब आजमावले जाण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही पक्षांकडे समान संख्याबळ असल्याने लोकशाहीतील या लढाईचा निकाल शेवटी ‘नशिबावर’ अवलंबून राहण्याची चिन्हे आहेत. भोर पंचायत समितीवर अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे.
मात्र, यंदा भाजपने मुसंडी मारत ४ जागा जिंकल्याने राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. जर नशिबाने साथ दिली आणि भाजपने बाजी मारली, तर भोर पंचायत समिती पहिल्यांदाच कमळ फुलणार आहे. याउलट, राष्ट्रवादीने जागा राखल्यास त्यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध होईल.





