Bhor News: भोरमध्ये दुष्काळी पंचनाम्यांना वेग! २३१० हेक्टर क्षेत्राची नोंद; ‘ही’ महत्त्वाची कागदपत्रे ठेवा तयार
Bhor News: भोर तालुक्यातील १५६ गावांमधील सुमारे २३१० हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण; महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाचे संयुक्त अभियान.

Bhor News- राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शासनाने खरीप हंगामासाठी राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये भोर तालुक्याचाही समावेश असून, तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचे पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. आतापर्यंत भोर तालुक्यातील १५६ गावांमधील सुमारे २३१० हेक्टर क्षेत्राचे दुष्काळी पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित गावांमध्येही पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पंचनामे महसूल विभाग, कृषी विभाग आणि ग्रामविकास विभागाच्या संयुक्त माध्यमातून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनाम्याच्या कामात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार राजेंद्र नजन यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी फार्मर आयडी, आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, सात बारा उतारा व आठ अ आदी कागदपत्रांसह आपल्या भागातील ग्राम महसूल अधिकारी,
सहाय्यक कृषी अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी संपर्क साधून नुकसान पंचनाम्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांनी इ-पीक पाहणी करून घ्यावी. ज्या शेतकऱ्यांची ऍग्रिस्टेक नोंदणी झालेली नाही, त्यांनी तात्काळ ऍग्रिस्टेक नोंदणी करून प्रशासनास सहकार्य करावे, असेही तहसीलदार राजेंद्र नजन यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
दुष्काळी पंचनाम्याच्या प्रक्रियेला वेग आल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या संभाव्य मदतीचा मार्ग मोकळा होत आहे. संगमनेर (ता. भोर) येथे दुष्काळी पाहणी करण्यात आली. यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी सुनील जाधव, तहसीलदार राजेंद्र नजन, तालुका कृषि अधिकारी शरद धर्माधिकारी साहेब, नायब तहसीलदार अरुण कदम, मंडळ कृषि अधिकारी प्रशांत सरडे, उप कृषि अधिकारी हनुमंत डांबे,
ग्रामविकास अधिकारी शाहजान बाणदार, ग्राम महसूल अधिकारी हिमानी चोपडे तसेच संगमनेर गावातील उपसरपंच प्रमोद बांदल, बाळू गव्हाणे, निलेश जगदाळे, वसंत बांदल, गणेश बांदल, बाबासाहेब जगदाळे, कैलास जगदाळे, नितीन जगदाळे, नागेश बांदल, अनिल बांदल इतर शेतकरी उपस्थित होते. नियोजन सहाय्यक कृषि अधिकारी किरण बोऱ्हाडे यांनी केले.





