Dada Kondke Memorial: दादा कोंडके कायम स्मरणात राहतील! इंगवलीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे उद्गार
Dada Kondke Memorial: चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते स्व. दादा कोंडके यांच्या जयंतीनिमित्त इंगवली (ता. भोर) येथे स्मारकाचे भूमीपूजन; ५ कोटींचा ग्रामविकास निधी जाहीर.

Dada Kondke Memorial – राजकारणात अनेक मंत्री येतात आणि जातात, काही कालावधीनंतर नागरिक त्यांची नावेही विसरतात. परंतु, महाराष्ट्रातील जनता दादा कोंडके यांचे नाव आणि त्यांची लोककला कधीही विसरू शकत नाही. दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी भाषेला देशाच्या नकाशावर सर्वोच्च स्थानी पोहोचवले,असे उद्गार राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काढले.
चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते स्व. दादा कोंडके यांच्या जयंतीनिमित्त इंगवली (ता. भोर) येथे ‘दादा कोंडके स्मारका’चे भूमीपूजन करण्यात आले. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे बोलत होते. ते पुढे म्हणाले, निधीतून आम्ही दादांच्या स्मारकासाठी ५ कोटी रुपये देणार आहोत. परंतु, मुख्य स्मारक बांधण्यापूर्वी दादांचे जुने मूळ घर व्यवस्थित बांधावे.
याशिवाय आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर हे आपल्या आमदार निधीतून प्रत्येकी ५० लाख रुपये, तर आमदार शंकर मांडेकर ७० लाख रुपये देणार आहेत. असा एकूण ६ कोटी ७० लाख रुपयांचा निधी या स्मारकासाठी मिळणार असून, कामात निधी कमी पडल्यास ‘देवाभाऊ’ खंबीर पाठीशी आहेत,” असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

इंगवली (ता. भोर) : येथे स्वर्गीय दादा कोंडके यांच्या स्मारकाचे भूमीपूजन करताना मंत्री जयकुमार गोरे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार शंकर मांडेकर व इतर मान्यवर.
या वेळी बोलताना आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, दादा कोंडके यांच्यामुळेच प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने खेडेगावातील वास्तववादी जीवनपट पाहायला मिळाला. दादांची गाणी ही गावगाड्याशी जोडलेली आणि द्वयर्थी कोट्यांनी नटलेली होती. त्यांची गाणी कानावर पडताच सामान्य माणूस आपोआप गुणगुणू लागतो. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, “दादांबद्दल महाराष्ट्रात प्रत्येकाच्या मनात नितांत आदर आहे. असा अष्टपैलू कलाकार महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही.
सलग ९ चित्रपट सिल्व्हर ज्युबली
दादा कोंडके यांचे पुतणे विजय कोंडके यांनी दादांच्या बालपणीच्या आठवणी व जीवनप्रवास उपस्थितांसमोर मांडला. “दादांनी मुंबईत काही काळ नोकरी केल्यानंतर ‘विच्छा माझी पूरी करा’ या नाटकातून अभिनयसृष्टीत पदार्पण केले आणि या नाटकाचे तब्बल १२०० प्रयोग गाजवले. त्यानंतर त्यांनी ‘सोंगाड्या‘ हा पहिला चित्रपट केला. या पहिल्या चित्रपटासह त्यांचे सलग ९ चित्रपट सिल्व्हर ज्युबली (२५ आठवडे) ठरण्याचा ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला,” असे त्यांनी सांगितले.





