Sunetra Pawar: ‘दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट दूर व्हावं’; श्री मयुरेश्वराच्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे साकडं
Sunetra Pawar: शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख-समाधानाचे दिवस यावेत, अशी भावना सुनेत्रा पवारांनी केली व्यक्त

मोरगाव – राज्यावर ओढवलेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट दूर व्हावे, राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या शेतशिवारात पुन्हा हिरवळ फुलावी, यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज श्री क्षेत्र मोरगाव, ता. बारामती येथील अष्टविनायकातील प्रथम गणपती श्री मयुरेश्वराच्या चरणी प्रार्थना केली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्री मयुरेश्वराचे विधीवत पूजन करून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकरी बांधवांच्या सुख-समृद्धीसाठी तसेच पाण्याचे संकट दूर होऊन राज्यात समाधानकारक पाऊस पडावा, अशी प्रार्थना केली.
बळीराजाच्या कष्टाला आणि घामाला यश मिळावे, शेतशिवारात पुन्हा पिकांची हिरवळ फुलावी आणि शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख-समाधानाचे दिवस यावेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती दूर होऊन शेतकरी बांधवांना आवश्यक तो दिलासा मिळावा, त्यांच्या कष्टाला योग्य फळ मिळावे आणि महाराष्ट्रात सर्वत्र समृद्धी नांदावी, हीच श्री मयुरेश्वराच्या चरणी मनोभावे प्रार्थना, असे यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.





