Bhor Crime: दारूच्या बाटलीसाठी आईचा बळी! भोर तालुक्यातील म्हाळवडी येथील धक्कादायक घटना
Bhor Crime: हत्या केल्यानंतर आईचा मृतदेह घरातच ठेवून ठोकले कुलूप; शेजाऱ्यांना दिली खोटी माहिती, दुसऱ्या दिवशी भयंकर प्रकार आला उघडकीस.

Bhor Crime – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका निर्दयी मुलाने स्वतःच्या आईच्या डोक्यात व तोंडावर लोखंडी रॉडने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना म्हाळवडी (ता. भोर) येथे घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत बेबी काळू मालुसरे (वय ५२) असे मृत महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी भोर पोलिसांनी आरोपी मुलगा समीर काळू मालुसरे (वय ३१) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर याने दारू पिण्यासाठी आईकडे पैसे मागितले होते. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिल्याने तो संतप्त झाला. रागाच्या भरात त्याने घरातील लोखंडी रॉडने आईवर गंभीर हल्ला केला.
यात बेबी मालुसरे यांचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपीने आईचा मृतदेह घरातच ठेवून बाहेरून कुलूप लावले. शेजाऱ्यांनी आईबाबत विचारणा केली असता, ती गावाला गेल्याची खोटी माहिती त्याने दिली. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ही धक्कादायक बाब उघडकीस आली. या प्रकरणाचा पुढील तपास भोरचे पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे करत आहेत.





