Bhigwan Station : फुकटचं पाणी आता विकत मिळणार? भिगवण स्टेशनमध्ये ‘पाणीपट्टी’वरून रणकंदन
Bhigwan Station : भिगवण स्टेशनच्या वॉर्ड क्रमांक ६ मध्ये विनापरवाना सशुल्क पाणीपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न; ग्रामपंचायत सदस्याच्या मनमानी कारभारावर ग्रामस्थांचा तीव्र आक्षेप.

Bhigwan Station – भिगवण स्टेशन येथील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये सध्या ग्रामपंचायतीमार्फत मोफत सुरू असलेली जलशुद्धीकरण यंत्रणा आता सशुल्क होण्याच्या मार्गावर आहे. येथील एका ग्रामपंचायत सदस्याने प्रशासनाची कोणतीही रीतसर परवानगी न घेता, शुद्ध पाण्यासाठी ग्रामस्थांकडून पैसे जमा करण्याचे आवाहन केल्याने वादाला तोंड फुटले आहे.
ऐन उन्हाळ्यात पाणी मोफत देण्याऐवजी पैसे उकळले जात असल्याने ‘ही जनतेची लूट’ असल्याची चर्चा गावात रंगली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, वॉर्ड क्र. ६ मधील जलशुद्धीकरण केंद्राचा देखभाल-दुरुस्ती खर्च सध्या ग्रामपंचायत करत असून ग्रामस्थांना मोफत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, येथील एका सदस्याने ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता या ठिकाणी नवीन यंत्रणा बसवणार असल्याचे जाहीर केले.
यासाठी नोंदणी शुल्क १०० रुपये आणि कार्ड रिचार्जसाठी १०० रुपये, असे एकूण २०० रुपये आकारले जाणार असल्याचे सांगत गुरूवार (दि. २३) पासून नावनोंदणी व कार्ड वाटप केले जाणार असल्याचे सांगितले. मुळात ग्रामस्थांना मूलभूत सोयी-सुविधा आणि शुद्ध पाणी मोफत पुरवणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे.
प्रशासनाची भूमिका –
यासंदर्भात ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय परदेशी यांनी सांगितले की, स्टेशन येथील फिल्टर प्लांटवर स्थानिक नागरिकांपेक्षा बाहेरील लोकांचा राबता जास्त असतो. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर (ट्रायल बेसिस) तिथे मशीन बसवण्याबाबत केवळ प्राथमिक चर्चा झाली आहे, अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, ग्रामस्थांना पैसे द्यावे लागणार का, या प्रश्नावर त्यांनी मौन पाळले.
भिगवण स्टेशन येथील पाणी फिल्टर यंत्रणेत सत्ताधाऱ्यांनी यापूर्वीही मोठा भ्रष्टाचार केला आहे. सुरुवातीला ही यंत्रणा वैयक्तिक असल्याचे सांगून बसवण्यात आली आणि नंतर देखभालीचा खर्च ग्रामपंचायतीच्या माथी मारण्यात आला. आता ऐन उन्हाळ्यात शुद्ध पाण्यासाठी पैसे मोजावे लागणार असतील, तर ही शुद्ध लूटच आहे.
– ॲड. सूरज खटके, ग्रामस्थ, भिगवण स्टेशन.





